आपल्या बांधावर, घराच्या आसपास अथवा शेतात कुठेही दर्शनी भागात एखादे चंदनाचे झाड असेल तर त्याची राखण कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. चंदनाच्या झाडांची सहजपणे चोरी होत असल्याचा महाराष्ट्रातील अनेकांना अनुभव आलाय. मात्र एका धडपड्या शेतकऱ्यांने एक, दोन नव्हे तब्बल सत्तावीस एकरावर नऊ हजार चंदनाच्या झाडाची लागवड केली. त्या झाडाची ते सक्षमपणे रक्षण करत आहोत. नगर जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्शगाव राळेगण सिद्दी गावाजवळच पिंपळनेर (ता. पारनेर) येथील राजेंद्र रावसाहेब गाडेकर यांनी माळरानावर चंदनाची शेती यशस्वी करुन दाखवलीय. चंदनाच्या झाडातच डाळिंब, संत्रा, आवळा, सीताफळ आणि त्यात आंतरपीक चंदन अशी शेती ते करत आहेत. महाराष्ट्रातील विविध भागातील शेतकरी येथे येऊन चंदन शेतीची पाहणी करत कौतुक करत आहेत. अजून काही वर्षातच राजेंद्र गाडेकर चंदन उत्पादनातून करोडपती होतील.
नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील पानोलीचे मूळ रहिवासी असलेले राजेंद्र गाडेकर सध्या पिंपळनेर येथे राहतात. त्यांनी दहा वर्षांपूर्वी संत निळोबाराय यांचे समाधिस्थळ असलेल्या पिंपळनेर शिवारातील माळरानावर ३० एकर जमीन खरेदी केली. हे क्षेत्र म्हणजे जवळपास डोंगरच होता. त्याचे सपाटीकरण करून ती लागवडीयोग्य करण्याचे कष्ट उपसले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेऊन फळझाडेकेंद्रित शेती करण्यावर भर दिला.
राजेंद्र गाडेकर यांचे डाळिंब पीक होते. मात्र, तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव, पडलेले दर यामुळे मध्यंतरीच्या काळात हे पीक धोक्यात आले. त्याच काळात चंदन लागवडीबाबत माहिती मिळाली. कर्नाटक भागात या पिकाची शेती विकसित झाली आहे, हे माहीत असल्याने तेथे व गुजरात राज्यात काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्याचे दर, अर्थकारण, जोखीम या बाबी अभ्यासल्या. अखेर आंतरपीक म्हणून त्याची लागवड करण्याचे पक्के केले.
वाटा ः # गौरवगाथा ः तरुणाने हार नाही मानली, जिद्दीने सुरु केला व्यवसाय. ही गौरवगाथा तर वाचलीच पाहिजे.
त्यानुसार राजेंद्र गाडेकर यांनी २०१७-१८ मध्ये मदुराई (तमीळनाडू) येथून सफेद चंदनाची रोपे आणली. दोन टप्प्यांत एकाच वर्षात सुमारे सत्तावीस एकरांत डाळिंब, संत्रा, आवळा, सीताफळ आदी पिकांत चंदनाच्या सुमारे नऊ हजार रोपांची लागवड. असा प्रयोग करणारे गाडेकर हे एकमेव शेतकरी आहेत. सध्या त्यांच्याकडे १३ एकर डाळिंब, ४ एकर संत्रा, ९ एकर सीताफळ, एक एकरावर आंबा व आवळा त्यात सर्व ठिकाणी चंदनाची झाडे लावली आहेत.
चंदनाच्या झाडाला साधारण तीन वर्षांत बिया येतात. त्याची ते विक्री करतात. त्यांना ३०० ते ६०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. संपूर्ण तीस एकरांत ठिबक. सामूहिक शेततळे योजनेतून एक कोटी ७५ लाख लिटर क्षमतेचे शेततळे. दोन विहिरींचा आधार. चंदनाला आठवड्याला ४ लिटर पाणी पुरते. मिलिया डूबिया, कडुनिंब लागवड चंदन हा परोपजीवी वृक्ष आहे, त्यामुळे आधारासाठी मिलिया डूबियाच्या दोन हजार झाडांची लागवड केली आहे. हे झाड सातव्या वर्षी तोडणीला येते. काडीपेटी निर्मिती, तसेच जहाजांसाठी लागणारे लाकूड, प्लायवूड यासाठी झाडाचा वापर होतो.
वाचा ः #gauravgatha गांडूळ खतातून मिळतेय चांगले उत्पन्न ः प्रशांत पुलाटे या तरुणांची गौरवगाथा
त्यापासूनही चांगल्या उत्पन्नाची गाडेकर यांना आशा आहे. या भागात प्रयोग म्हणून मोहाच्या दहा झाडांची लागवड केली आहे. चंदनाचे झाड स्वतः अन्न तयार करीत नाही. त्याच्याशेजारी कडुनिंबाचे झाड असले तर चंदनाच्या वाढीला फायदा होतो. त्यामुळे प्रत्येक चंदनाजवळ एक अशी कडुनिंबाची पाच हजार झाडे लावली आहेत. या भागात हरिणांसह अन्य वन्यप्राण्यांचा वावर आहे. चंदनाची भविष्यात चोरीही होऊ शकते, त्यामुळे झाडांच्या सुरक्षेसाठी शिकेकाई, सागरगोटा, केकताड आदी काटेरी वनस्पतींची व सौर कुंपणाची सुविधा केली आहे.
सीताफळाची जुनी साडेचार हजार झाडे आहेत. प्रत्येक झाड सुमारे २५ ते ३० किलो फळ देते. त्यास किलोला ६० ते १०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. संत्र्याचे चार एकरांत ५० टन उत्पादन, तर ६ ते ७ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. आवळ्याचे अर्ध्या एकरात अडीच टनाचे उत्पादन, तर ५० ते ६० रुपये दर मिळाला आहे. डाळिंबदेखील उत्पन्नाचा स्रोत झाले आहे. पुणे आणि मुंबई या बाजारांत विक्री होते. दर्जेदार उत्पादनामुळे थेट खरेदीदारांशी संपर्क वाढला आहे.
दरवर्षी दहा ते पंधरा एकरांवर हिरवळीच्या खतासाठी तागाची लागवड होते. यंदा त्याच्या बियाण्याची विक्री करण्याचे नियोजन आहे. त्याच्या बियाण्याला ७० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. यंदा दीड एकरात खरीप बाजरीचे आंतरपीक, तर सात एकरांवर ताग घेतला आहे. याआधीही कांदा, हरभरा, तुरीचेही आंतरपीक घेऊन उत्पन्न मिळवले आहे.तीस एकरांवरील फळझाडांना रासायनिक खत दिले जात नाही. त्याऐवजी शेणखत आणि गांडूळ खताचा वापर करतात. पीक अवशेष, हिरवळीच्या खतांचाही वापर होतो. त्याच्या वापरातून घेतल्या जाणाऱ्या उत्पादनाची सध्या सर्वदूर चर्चा होत आहे.
वाचा ः # jiryaniyam जिराॅनियम शेती पाहिलीय का, वैभव काळे ला कमी वयात मिळतोय मान सन्मान आणि पैसाही
पत्नी सौ. शारदा व शिक्षण घेत असलेली मुले साहिल व संपदाही वेळप्रसंगी शेतीत मदत करतात. नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच चंदनाची रोपवाटिका सुरू केली आहे. ३० ते ६० रुपये प्रतिरोप याप्रमाणे आतापर्यंत १३ हजार रोपांची विक्री केली आहे. एकात्मिक फळशेती आणि चंदनाची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत दोन हजारांवर शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
गाडेकर यांची प्रेरणा घेत पिंपळनेरचे बबनराव लटांबळे व प्रवीण गाजरे यांनीही चंदनाची लागवड केली आहे. गाडेकर यांच्याकडे संत्र्याची १६००, डाळिंबाची ६०००, सीताफळाची ८०००, आवळा व आंबा- प्रत्येकी ४०, चंदनाची ९ हजार, कडुनिंबाची ५ हजार, नारळाची १०, पेरूची २५, मिलीया डूबियाची २००० झाडे आहेत. गाडेकर सांगतात की साधारण आठ वर्षांनंतर उत्पादन घेता येते. मात्र मी १३ ते १५ वर्षांनंतरच त्याचा विचार करणार आहे. कर्नाटक राज्यात १३ वर्षे वयाच्या झाडापासून सुमारे २९ किलो उत्पादन मिळाले आहे. त्याला ९००० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. भविष्यात हे पीक आर्थिकदृष्ट्या निश्चित फायदेशीर ठरू शकते असे गाडेकर यांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी राजेंद्र गाडेकर- ९६७३४२१४१२
0 टिप्पण्या