Ad Code

#gauravgatha गांडूळ खतातून मिळतेय चांगले उत्पन्न ः प्रशांत पुलाटे या तरुणांची गौरवगाथा

                                               तयार झालेले गांडुळ खत दाखवताना प्रशांत पुलाटे.  

गांडुळ खत निर्मिती रोजगाराचे साधन बनेल. त्याच्या शेतीला चांगला पुरक आणि जोड व्यवसाय बनेल असे जर कोणी म्हणत असेल तर विश्वास बसणार नाही. पण हे एका जिद्दी तरुणाने खरे करुन दाखवलेय. सध्या मागणी आणि शेतीची  गरज काय आहे हे ओळखूनच गांडुळ खत तयार करण्याचे तंत्र अवलंबवले. दुर्गापूर (ता. राहुरी) येथील तरुण शेतकरी मित्र वर्षभरात तब्बल दोनशे टन गांडुळ खताची निर्मिती करता येते हे दाखवून दिलेय. गांडुळ खतासोबतच  बाजारपेठ ओळखून फळबागेला गांडूळखत आणि व्हर्मीवॉश निर्मितीची जोड दिली आहे. शेती तंत्रात बरच काही काही करणाऱ्या या युवा शेतकरी मित्र आदर्शच बनला आहे. 

-----

वाचा दुध उत्पादकाची गौरवगाथा ः # गौरवगाथा ः तरुणाने हार नाही मानली, जिद्दीने सुरु केला व्यवसाय. ही गौरवगाथा तर वाचलीच पाहिजे.

-------------

नगर-संगमनेर मार्गावर कोल्हारपासून नऊ किलोमीटरवर दुर्गापूर हे गाव आहे. या गावातील लक्ष्मण पुलाटे हे प्रयोगशील शेतकरी. बाजारपेठेनुसार त्यांनी पीक बदल करत शेतीला नवी दिशा दिली. १९८१ पासून त्यांच्याकडे द्राक्ष आणि १९९० पासून डाळिंब बाग आहे. फळबागेला पुरेशा प्रमाणात सेंद्रिय खताची उपलब्धता होण्यासाठी त्यांनी १९९० पासून गांडूळखत निर्मितीला सुरवात केली. यासाठी त्यांना बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांची मदत मिळाली. दरवर्षी सरासरी दोन टन गांडूळखताची निर्मिती सुरू झाली. 

                                              गांडुळ खत तयार करण्यासाठी टाकलेले बेड 

परिसरातील शेतकऱ्यांकडूनदेखील गांडूळखताची मागणी वाढू लागल्याने त्यांनी उत्पादनात वाढ केली. या गांडूळखत प्रकल्पाच्या विस्ताराची जबाबदारी त्यांचा मुलगा प्रशांत याने घेतली आहे. प्रशांत याने बीएस्सी कृषी जैवतंत्रज्ञान आणि एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर २०११ मध्ये ॲग्रिक्लिनिक ॲन्ड ॲग्री बिझनेस हा कोर्स केला. त्यानंतर नाबार्डच्या मदतीने नगर जिल्हा सहकारी बॅंकेकडून नऊ लाखांचे कर्ज घेऊन सुधारित गांडूळखत प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पासाठी नाबार्डकडून अनुदानही मिळाले. 


प्रशांत पुलाटे यांचे कुटुंब पहिल्यापासूनच गांडूळखत निर्मितीमध्ये असल्याने प्रकल्प विस्ताराला मदतच झाली. सुरवातीच्या काळात प्रति वर्षी ४० टन गांडूळखताची निर्मिती व्हायची. मात्र वाढती मागणी लक्षात घेऊन गेल्या चार वर्षापासून उत्पादनात वाढ सुरू केली. सध्या प्रशांत पुलाटे दर दोन महिन्याला पस्तीस टन म्हणजेच वर्षाला सरासरी २०० टन गांडूळखताचे उत्पादन करतात. यातील पंचवीस टन खत स्वतःच्या शेतात वापरतात. उर्वरित खताची शेतकऱ्यांना विक्री केली जाते. सध्या उत्पादनापेक्षा मागणी अधिक आहे.


वर्मी वाॅस तयार करण्यासाठी मांडलेले ड्रम 

प्रशांतने शिक्षणानंतर सुरवातीला दोन वर्ष खासगी कंपनी आणि त्यानंतर २०११ पासून कृषी विभागाच्या आत्मा विभागात तालुका समन्वयक म्हणून नोकरी केली. मात्र शेती आणि खत प्रकल्पाची जबाबदारी वाढल्याने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी नोकरीचा राजीनामा दिला. गांडूळखत आणि व्हर्मीवॉशची विक्री करण्यासाठी ‘आनंद ॲग्री बायोटेक’ नावाने नोंदणी केली आहे. त्यांनी गांडूळखताचा व्हर्मीरिच आणि व्हर्मीवॉशचा व्हर्मीबुस्ट हा ब्रॅंड तयार केला. गांडूळखत आठ हजार रुपये टन आणि व्हर्मीवॉश शंभर रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जाते. 

----------

हे ही वाचा ः # milk दूधाचा भाव देता येत नाही म्हणता, करा की मग खाजगी दुध संघाचे आॅ़डीट

---------

दोनशे टन शेणखताची खरेदी ः 

प्रशांत पुलाटे हे दर्जेदार गांडूळखत निर्मितीसाठी पूर्णपणे शेणखताचा वापर करतात. परिसरातील पशुपालकांकडून चार हजार रुपये प्रति ट्रेलर या दराने शेणखताची खरेदी केली जाते. वर्षभरात सुमारे सव्वादोनशे ट्रेलर शेणखताची खरेदी होते. यामुळे परिसरातील पशुपालकांनाही आर्थिक फायदा होत आहे.


शेतीत वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या पुलाटे कुटुंबाकडे नऊ एकर शेती आहे. सध्या पाच एकरावर भगवा डाळिंब, दोन एकरावर थॉम्पसन द्राक्ष बाग, एक एकर गहू आणि एक एकरावर हंगामी फुलपिकांची लागवड आहे. पुलाटे यांनी १९९० पासून फळबागेला गांडूळखत वापरायला सुरवात केली. गेल्या सात वर्षापासून त्यांनी शेतीमध्ये ७० टक्क्यांपर्यंत गांडूळखताचा वापर सुरू केला. केवळ तीस टक्के रासायनिक खतांचा वापर केला जातो. गांडूळखताच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला. वर्षाला रासायनिक खतावरील ४० टक्के खर्च कमी झाला. पूर्वी द्राक्षाचे एकरी १० टन उत्पादन मिळायचे, ते १४ टनांवर पोचले आहे. डाळिंबाचे एकरी पाच टनांवरून आठ टनांपर्यंत उत्पादन गेले आहे. उत्पादनाचा दर्जा सुधारला. पीक व्यवस्थापनाचा खर्च कमी झाला.


प्रशांत पुलाटे यांचा हा आदर्श घेण्यासारखा 

- प्रशांत पुलाटे हे गांडूळखतासोबत व्हर्मीवॉश निर्मिती करतात. यासाठी त्यांनी पन्नास लिटर क्षमतेचे दहा आणि शंभर लिटर क्षमतेचे सहा ड्रम प्रकल्पामध्ये बसविले आहेत. 

- ड्रमच्या तळाशी साधारण दीड फूट वाळू, दगड, विटांचे फिल्टर आणि त्यावर जाळी बसवलेली आहे. त्यानंतर शेणखत भरून त्यामध्ये दोन किलो गांडुळे सोडलेली आहेत. 

- पन्नास लिटरच्या ड्रममध्ये पहिल्यांदा सहा लिटर पाणी सोडले जाते. ड्रममधील शेणखत आणि गांडुळांमधून हे पाणी ड्रमच्या तळाला बसविलेल्या नळातून बाहेर पडते. हेच पाणी दररोज दहा दिवस पुन्हा त्याच ड्रममध्ये टाकले जाते. त्यानंतर अकराव्या दिवशी ड्रमवर लावलेल्या एक लिटर क्षमतेच्या बादलीत ड्रममधून गोळा झालेले पाणी टाकून ते हळूवार थेंब थेंब ड्रममध्ये २४ तास सोडले जाते. त्यापासून दररोज साधारण ७०० मिलिप्रमाणे पंधरा दिवसात दहा ते बारा लिटर व्हर्मीवॉश एका ड्रममधून मिळते. 

- प्रकल्पातून दरवर्षी सुमारे एक हजार लिटर व्हर्मीवॉश तयार होते. शेतकऱ्यांकडून यास चांगली मागणी आहे. ठिबक सिंचनातून व्हर्मीवॉश सोडले जाते. यामुळे पांढरी मुळी आणि झाड चांगले वाढते.

- गांडूळखताचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्बातदेखील वाढ होत असल्याचा प्रशांत यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गांडूळखताचा वापर करावा, असा प्रशांत यांचा आग्रह असतो. प्रशांत गांडूळखत उत्पादनासोबत दरवर्षी साधारणपणे पाच टन गांडूळ बीज तयार करतात. त्याची चारशे रुपये किलो दराने विक्री केली जाते. 

- नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून जागेवर गांडूळखताची खरेदी करतात. शेती, गांडूळखत आणि व्हर्मीवॉश निर्मितीसाठी वर्षभर पाच मजुरांना रोजगार देता आला आहे. प्रकल्पाला भेट देणाऱ्यांना मोफत मार्गदर्शन, शेतीपूरक उद्योगाबाबात जागृती करतात. आतापर्यंत अनेक तरुणांनी गांडूळखत निर्मिती व्यवसायास केली सुरवात केली आहे. त्यामुळे तुम्ही संपर्क करुन हा शेतीला जोड असलेला व्यवसाय सुरु करु शकता.  

---------------------------

                                   संपर्क ः प्रशांत पुलाटे, ७०५७४३९०३०, ९४२१८३९०३०



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu