एखाद्या क्षेत्रात जिद्दीने आणि नियोजनातून काम केले तर तो नक्कीच यशस्वी होऊ शकतो. अहमदनगर- नाशिक रस्त्यावर असलेल्या देहरे (ता. अहमदनगर) येथील तरुण शेतकरी वैभव विठ्ठल काळे यांनी हे दाखवून दिले आहे. वैभव काळे यांनी ऊस व अन्य पिकांची शेती बंद करुन जिराॅनियन शेती सुरु केली. टप्प्याटप्प्याने चार वर्षापासून दहा एकरावर जिराॅनियनची लागवड केली. स्वतः तेल काढणीचे युनिट उभारुन शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत तयार केला आहे. स्वतःच्या शेतीत यशस्वी झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांसोबत करार करुन पंचवीस एकरावरही जिराॅनियन लागवड केली आहे. वैभव लक्ष्मी जिराॅनियम फार्म असे त्यांनी या प्रकल्पाला नाव दिले आहे. कमी वयात वैभव काळे यांनी जिराॅनियम शेतीतून पैसा आणि मान-सन्मानही मिळवला आहे.
अहमदनगर - नाशिक रस्त्यावर देहरे नावाचे गाव लागते. अहमदनगर शहरापासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या देहऱे गावात शेतीला मुळा धरणाचा आधार. या भागात उपलब्ध पाण्यावर शेतकरी ऊस, फळपीके, कांदा यासारखी पीके घेतली जातात. शहराला जवळ असल्याने शेतीला दुध व्यवसायाचाही जोड शेतकरी देत आहेत. दुध उत्पादन करणारे गाव अशी देहऱ्याची ओळख आहे. मात्र आता या भागातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नव्याने शेतीत वेगवेगळे पीके घेण्याकडे कल वाढला आहे. त्यातूनच या भागातील तरुण शेतकरीही जिराॅनियमची लागवड करु लागले आहेत. यापिकांतून वर्षाला 30 ते 40 लिटर तेल निघते. एक लिटर तेलाला 12 हजाराचा दर आहे.
विठ्ठलराव काळे यांना वीस एकर शेती. पत्नी लताबाई यांच्या मदतीने शेती केली. मुलगा वैभवला बीएस्सी अॅग्रीचे शिक्षण दिले. पुर्वी ते गहू, कांदा, ज्वारी, बाजरीसह अन्य पीके घेत. 2005 साली त्यांनी आठ एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली. मात्र डाळिंबासाठी खते, फवारणीसह अन्य लागणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात तफावत येत होती. शिवाय लाल्या व अन्य रोगांचा सातत्याने प्रादुर्भाव होत असल्याने 2016 साली त्यांनी डाळिंबाची बाग काढून टाकली. वैभव यांनी 2017 साली साली बीएस्सीचे शिक्षण पुर्ण केल्यावर गुजरातमध्ये एका कंपनीत चार महिने नोकरी केली व त्यानंतर काही काळ कांदा खरेदीचा व्यवसाय केला. डाळिंबाची बाग काढल्यानंतर मात्र वैभव यांनी पुर्णवेळ शेती करण्याचा निर्णय घेत शेतीची सुत्रे हाती घेतली. त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने मुंबईत सुंगधी वस्तू तयार करणाऱ्या आणि जीराॅनियम तेल खरेदी करणाऱ्या कंपनीतून लागवड व अन्य बाबीची माहिती घेतली. लखनौ येथे पाच दिवसाचे ट्रेनिंग घेतले. त्यानंतर 2017 साली त्यांनी सुरवातीला एका एकरावर जिराॅनियमची लागवड केली. आता त्यांनी तब्बल दहा एकरावर जिराॅनियम लागवड केली असून दहा एकरावर ऊस आहे.
जिराॅनियम शेतीचे व्यवस्थापन
- लागवडीआधी प्रती एकरी शंभर किलो संयुक्त खते, शेणखते टाकून चार फुट आंतरावर बेड तयार केली जातात व दोन रोपांत एक फुट आंतर ठेवून लागवड.एकरी दहा हजार रोपांची संख्या. सुरवातीला रोपे तेल खरेदी करणाऱ्या कंपनीनेच उपलब्ध करुन दिली. लागवडीनंतर एकरी 1 किलोची किटनाशकांची आळवणी. एकरी चार ते पाच किलो दर पंधरा दिवसाला ठिंबकमधून संयुक्त खताचा डोस दिला जातो. जिराॅनियम पाल्याची कापणी दर चार महिन्याला. एकदा लागवड केल्यावर तीन वर्ष चालते. मात्र आडीच महिन्यापर्यतच खताच्या मात्रा. दर पंधरा दिवसाला एकदा पाणी. कापणीनंतर पुन्हा नव्याने येणाऱ्या झाडावर बुरशीनाशकांची एक फवारणी. दिड वर्षापासून जिराॅनियम लागवडीसाठी मल्चिंगचा वापर. त्यामुळे पाण्यात बचत, तणापासून सुटका. पांढऱ्या मुळाची संख्या वाढते. पाल्याचाही चांगली वाढ होते. जिराॅनियनचे तेल काढण्यासाठी वैभव यांनी स्वतः दोन लाख रुपये खर्च करुन युनिट उभारले आहे. आता त्याचा विस्तार करुन रोज एक टन पाल्याचे तेल काढणी क्षमता वाढवून ती चार टन केली आहे. एक टनाचे तेल काढायला एक हजाराचा खर्च केला आहे. बाजारात जिराॅनियमच्या तेलाला 12 हजार पाचशे रुपयाचा दर. कंपनीने ठरवून दिलेल्या निकषानुसार तेलाची मुंबईतील सौदर्य प्रसाधने करणाऱ्या कंपनीकडून खरेदी. काढलेले तेल विक्रीसाठी वेगववेगळ्या आकारात पाॅकिंग केले जाते. काढलेले तेल विक्रीसाठी स्वतः घेऊन जातात. किंवा वाहनातून पाठवून दिले तरी रितसर वजनानुसार पावती करुन पैसे आॅनलाईन वर्ग केले जातात. जिराॅनियम तेलाला चार वर्षापासून एकच दर. एका वर्षात एकरी तीस ते चाळीस टन पाला निघतो. त्यापासून 30 ते 40 किलो तेल निघते.
-----
वाचा शेतकऱ्यांची गौरवगाथा ः तरुणाने हार नाही मानली, जिद्दीने सुरु केला व्यवसाय. ही गौरवगाथा तर वाचलीच पाहिजे.
------
इतर शेतकऱ्यांनी केला प्रयोग
साधारण पाच वर्षैपुर्वी नगर जिल्ह्यात केवळ दोन ठिकाणी जिराॅनियमची लागवड झालेली. त्यात वैभव यांचा एक प्रयोग. यशस्वी प्रयोगानंतर अहमदनगर तालुक्यातील टाकळी खातगाव (ता. नगर) येथील योगेश पादीर, निलेश कुलट तर गावांतीलच हरिदास करंडे, भारत काळे, अमोल काळे यांनी लागवड केली. दैठणे गुंजाळ येथेही दहा एकरावर लागवड. एकून पंचवीस एकरावर लागवड. शेतकऱ्यांकडून पाला प्रती टन सहा हजार रुपयाने खरेदी करण्याचा किंवा दोन हजार रुपये प्रती किलो तेल काढून देण्याचा करार. करार पद्धतीने सुमारे शंभर एकरावर लागवडीचे टार्गेट ठरवले आहे. करार कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ते पन्नास टक्के किमतीत रोपांचा पुरवठा. लागवडीपासून काढणीपर्यत शेतकऱ्यांना व्यवस्थापनाचे मार्गदर्शन. वैभव यांच्या या भागातील पहिल्याच आगळ्या-वेगळ्या जिराॅनियम प्रयोगाचे शेतकऱ्यांना अप्रुप. आतापर्यत सुमारे पाच हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी भेटी दिल्या आहेत.
-------
ही शेतकऱ्याची गौरवगाथा वाचा ः गांडूळ खतातून मिळतेय चांगले उत्पन्न ः प्रशांत पुलाटे या तरुणांची गौरवगाथा
--------
स्वतः रोप निर्मिती, कंपोस्ट खत तयार करतात
तेल काढलेल्या जिराॅनियमच्या पाल्यापासून वैभव कंपोस्ट तयार करतात. एका एकरापासून साधारण तीस ते पस्तीस टन कंपोस्ट खत निर्मिती. त्या खताचा स्वतःच्या शेतीत वापर. पाल्यापासून गांडुळ खताची निर्मिती. महिन्याला तीन टन खताचे उत्पादन. त्यात वाढ करण्याचे नियोजन. यावर्षी एक एकरावर जिवामृत, जिवाणू खत, शेणखताच्या वापरातून सेंद्रीय खताच्या वापरातून जिराॅनियमचे पीक घेण्याच प्रयोग करत उत्पादन खर्च कमी केला आहे.
वर्षाला तीन लाख रोप जिराॅनियम लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल हळूहळू वाढत आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांना सहजपणे रोपे उपलब्ध व्हावीत यासाठी वैभव यांनी तीन वर्षापासून रोपवाटिका केली आहे. वर्षाला ते तीन लाख रोपे तयार करतात. त्यांनी सुरवातीला लागवड करण्यासाठी 10 रुपये प्रती रोप खरेदी केले होते. आता मात्र ते सहा ते आठ रुपयाला प्रती रोप विक्री करतात. स्वतःसाठी आणि अन्य शेतकऱ्यांसाठी त्यांनी ही रोपवाटिका सरु केलेली आहे. तेथे दहा मजुर दर दिवसाला काम करतात. याबाबत वैभव काळे म्हणाले. नैसर्गिक संकट, दराचा प्रश्न, वेगवेगळ्या कारणाने होणारे नुकसान. वन्यप्राण्यामुळे पिकांच नासाडी यामुळे शेतकरी सतत चिंतेत असतात. जिराॅनियमच्या शेतीवर मात्र या कोणत्याही बाबीचा परिणाम होत नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसमुळेही शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. आमचे मात्र कोणतेही नुकसान झाले नाही.
अधिक माहितीसाठी संपर्क करा ः वैभव काळे मो. 9860802064
-----------
0 टिप्पण्या