संभाजीराव दहातोंडे पाटील पुणे : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही कंपन्यांकडून विमा भरलेल्या लाभापासून नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी वंचित ठेवले आहे. त्यामुळे कंपन्यांवर कारवाई करावी आणि विम्यापासून वर्षभर वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने विम्याचा लाभ देण्याबाबत विमा कंपन्यांना सूचित करावे, अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. हे ही वाचा ः #Kharif crop insurance खरिप पीकविमा भरण्याला अजून सात दिवसाची संधी, व्हा सहभागी शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजीराव दहातोंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून विम्याबाबत वस्तुस्थिती मांडली आहे. पंतप्रधान मोदी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या वर्षी खरिपात अति पाऊस व इतर नैसर्गिक कारणामुळे शेतपिकांचे सातत्याने नुकसान झाले आहे. परतीचा पाऊसही जोरदार पडल्याचा शेतकऱ्यांना फटका सोसावा लागला. नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने शेतपिकाचे नुकसान झाले तर नुकसान भरपाई मिळावी म्हणून पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होत शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरला. नगर जिल्ह्यासह राज्यातील लाखो शेतकरी या योजनेत सहभागी झाले. मात्र नुकसान होऊनही पीकविमा कंपन्यांनी अजून, नगरसह अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ दिला नाही. नगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडूनही शेतकऱ्यांना विम्याच्या लाभाबाबत वस्तुस्थिती सांगितली जात नाही. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. राज्याच्या कृषी विभागाकडे आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या, परंतु त्याची दखल घेतली नाही. कोरोनासह अनेक नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत असून, सध्याची परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळणे अत्यंत गरजेचे आहे, मात्र यंदाच्या खरीप हंगामातील महिनाभराचा कालावधी गेला असला तरी अजूनही गतवर्षीच्या पीकविमा योजनेचा लाभ देण्याबाबत विमा कंपन्या काहीही बोलत नाही. शेतकरी मात्र त्रस्त आहेत. त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून यांना विमा योजनेचा लाभ द्यावा व शेतकऱ्यांना वंचित ठेवणाऱ्या विमा कंपन्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संभाजीराव दहातोंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत लवकरच दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. | |||
0 टिप्पण्या