Ad Code

# Ganapatrao Deshmukh एकच उमेदवार, एकच मतदार संघ, 55 वर्ष आमदार. प्रत्येक राजकारण्यांसाठी आदर्श गणपतराव आबा देशमुख


सांगोला (जि. सोलापुर) ः सलग 55 वर्ष एकाच मतदार संघात विधानसभेचे नेतृत्व. दोन वेळा राज्याचे मंत्री तरीही पाय जमीनीवर.एसटीतून प्रवास, साधेपणा आणि सामान्य माणसाच्या सेवेचे घेतलेले व्रत 94 वर्षाही कायम, अगदी शेवटच्या क्षणापर्यत. यामुळे राज्यातच नव्हे देशात आदराचे स्थान असलेले सांगोला (जि. सोलापुर) चे आमदार, महाराष्ट्रातील बुजुर्ग नेते आदरणीय गणपतराव देशमुख (आबा) यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळलाय. खरं तर गणपतराव देशमुख आबा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विद्यापीठ होते. 

गणपतराव देशमुख तत्वनिष्ठ राजकारणी आणि अलिकडच्या काळात बिनधास्तपणे  राजकारणातून पैसा मिळवणाऱ्यांच्या डोळ्यात तत्वनिष्ठतेचे झणझणीत अंजन घालणारे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक राजकारण्यांसाठी आदर्श होते.(Ganapatrao Deshmukh was a principled politician and, in recent times, a shining beacon of principledness in the eyes of those who earn money from politics without any hesitation and was a role model for every politician in Maharashtra.) 

सोलापुर जिल्ह्यातील सांगोला हा तसा दुष्काळी तालुका. या तालुक्याचे नेते गणपतराव देशमुख तथा महाराष्ट्राचे आबासाहेब. ते १५ मार्च १९६२ साली पहिल्यांदा आमदार झाले. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनीही देशमुख यांचं कौतुक केलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा विधानसभेत निवडून गेले होते. 

द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम माजी आमदार देशमुख यांनी मोडला होता. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार होते. त्यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे नेतृत्व केले. १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता. एक पक्ष, एक मतदार संघ आणि एकच उमेदवार तब्बल अकरावेळा आमदार म्हणून विजय दुर्मिळ घटना आहे. 

 विद्यार्थी दशेत असतानाच पुण्यात आबा यांच्यावर शेकापचे मोरे, जेधे, नाना पाटील, तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यासवर्ग घेत असत. घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले. निस्वार्थीपणे काम करण्याची शिकवण या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेऊनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले. खरं तर राज्यातील एकेकाळचा मोठा आणि वजनदार पक्ष म्हणून शेकापकडे पाहिले जात होते. 

नगर, सोलापुर, पुणे नाशकात डाव्या विचाराचा मोठा जोर होता. मात्र तरीही शेकाप कधीही महाराष्ट्रात सत्तेत आला नाही. जर शेकाप महाराष्ट्रात सत्तेत आला असता तर गणपतराव देशमुख हमखास मुख्यमंत्री झाले असते. मोठ्या पदाची लालसा त्यांनी कधीच पाळली नाही. शेवटच्या क्षणापर्यत आबात विचारासाठी एकनिष्ठ राहिले. पक्षाचे अस्तित्व संपत आले असले तरी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या मुळे रायगड जिल्ह्यात आणि गणपतराव देशमुख (Ganapatrao Deshmukh) यांच्यामुळे सोलापुरात शेकापची ताकद जपून  राहिली. 

राज्यात 1978 साली पुलोदचे सरकार आले त्यावेळी  व 1999 मध्ये गणपतराव देशमुख मंत्री झाली. त्यांनी  राज्याचे कृषीमंत्री, रोजगार हमी मंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. मजुरांना रोजगार मिळावा यासाठी सुरु झालेल्या रोजगार हमी योजनेला  त्यांच्याच काळात अधिक भरभराट आली. सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात फळबागांचे क्षेत्र वाढीसाठी गणपतराव देशमुख यांचा मोठा वाटा आहे. 

वयाने थकलेले असतानाही विधानसभेत गणपतराव देशमुख यांची शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजुर, दलितांच्या विकासासाठी, प्रश्न सोडवण्यासाठीची तळमळ कधीही थांबली नाही. चार -पाच वर्ष झाली असतील. नागपुरला हिवाळी अधिवेशन होते. त्यावेळी गणपतराव देशमुख वय झालेले असतानाही अधिवेशनासाठी गणपतराव देशमुख (आबा) नागपुरला एसटीने गेले होते. त्यामुळे सहकाऱ्यांसोबत एसटीतून उतरतानाचा त्यांचा फोटो महाराष्ट्र भर व्हायरल झाला होता. विविध वत्तपत्रात रकाने चे रकाने भरुन आबाच्या साधेपणाची महती मांडली गेली होती. आताही तो फोटो आताच्या राजकारण्यांनी आदर्श घ्यावा म्हणून अधून मधून सोशल मिडीयावर व्हायरल होत असतो. 

जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या विद्यमान आमदारांना वेतन तर माजी आमदारांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला आहे. सद्य:स्थितीत राज्यातील जवळपास 789 आमदारांना त्या पेन्शनचा लाभ मिळत आहे. सर्वाधिक पेन्शन घेणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव. त्यांना दरमहा पेन्शनपोटी मिळणाऱ्या रकमेतील एक रुपयाही त्यांनी स्वत:साठी खर्च केला नाही, त्यांना दरमहा एक लाख 42 हजारांची पेन्शन मिळत होती. कोरोना काळात त्यांनी पेन्शन गरिबांसाठी खर्च केली. 

गणपतराव देशमुख यांचा असाच एक किस्सा चर्चेत आला होता. एसटीमध्ये विधानसभा,  विधानपरिषद सदस्यासाठी राखीव अशी सूचना लिहलेली एक सीट असते. सहसा आमदार, खासदार म्हटले की हायफाय गाड्या, उ्ंचे राहणीमान असेच आज लोक मानतात. परिस्थितीही तशीच आहे. ज्या क्षणी मंत्रीपद गेले त्याच वेळी सरकारी गाडीचा त्याग करणारे ते एकमेव मंत्री होते. 

गणपतराव देशमुख सांगोल्याहून करमाळा किंवा पंढरपुर मार्गे मुंबईला एसटीेने जात होते. आमदारासाठी राखीव असलेल्या सीटवर बसलेले होते. कंडक्टर तिकीट मागायला आल्यावर माझ्याकडे पास असून मला एसटी प्रवास मोफत आहे असे त्यांनी कंडक्टरला सांगितले. कसला पास आहे असे कंडक्टरने विचारल्यावर मी आमदार असून माझे नाव गणपतराव देशमुख असल्याचे सांगितले. कंडक्टर नवखा असल्याने गडबडून गेला. विश्वास बसला नाही. पुढच्या स्थानकातील वाहतुक नियंत्रकांशी संपर्क केला आणि हकीकत सांगितली. गाडी स्थानकात आल्यावर स्वतः वाहतुक नियंत्रकांनी आबाचे स्वागत केले. चहापाणी करुन आपुलकीने चौकशी केली आणि पुढच्या प्रवासाला शुभेच्या दिल्या. हा किस्सा अजूनही राज्यभर चर्चेत असतो. 


आबांचा जन्म १९२७ साली झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. मात्र १९६२ सालापासून महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येणारे आबा दोन अपवाद सोडले तर ते निवडणुकीत पराभूत झाले नाहीत. अगदी मोदी लाटेतसुद्धा ते निवडून आले. पाय जमिनीवर असण्याची कला व साधेपणा या कारणामुळे लोकांनी त्यांना सातत्याने भरघोस मतांनी निवडून दिले. आज त्यांच्या जाणाने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. सांगोल्यातील सुतगिरणी परिसरात त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांपासून वयाची 80 वर्ष ओलांडलेले वयस्क माणसे, बाया-बापडे धाय मोकलूुन रडत होते. महाराष्ट्रातील राजकीय लोकांना आदर्श ठरणारे असे भाई पुन्हा होणे नाही. त्यांना अत्यंत जड अंतकरणाने भावपुर्ण आदरांजली. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu