शेवगाव : दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सहज वावरणे,प्रवास करणे,संवाद व संपर्क करणे शक्य व्हावे यासाठी 'अडथळा विरहित वातावरण' निर्माण व्हावे यासाठी दिव्यांग अधिकार अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग सक्षमीकरण विभाग,सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय,भारत यांचे वतीने दिव्यांग व्यक्तीसाठी सुगम्य अभियान राबवण्यात येत आहे.या दरम्यान नव्याने शाळा खोल्यांचे बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी दिव्यांगांना साहाय्यभुत ठरतील अशा सुविधांची निर्मिती करावी अशी मागणी 'सावली दिव्यांग' संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख यांनी शेवगावच्या पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत शेवगाव तालुक्यातील अनेक ठिकाणी नवीन शाळा वर्ग खोल्या बांधकाम चालु आहे.बांधकाम चालु असलेल्या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थांसाठी वर्ग खोल्या व परिसरात सुलभ वावर होणेकरीता असणारी सुविधा जसे इमारतीमधील फुटपाथ उतार,वळणे,सुयोग्य रॅम्प,रेलींग,आधारासाठी कठडे,पार्किंग,आणीबाणीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी सुविधा,स्वतंत्र शौचालय,दृष्टीहिन दिव्यांगासाठी सेन्सरच्या फरशा आदि सुविधा नसल्याचे आढळून आल्याने 'सावली'च्या निदर्शनास आले आहे.
बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांना सुगम्य भारत योजनेंतर्गत दिव्यांग विध्यार्थ्यांना वर्ग खोल्याकडे येण्या-जाण्यासाठी शासन नियमानुसार दिव्यांगासाठीचे सुसज्ज रॅम्प सह इतर सुविधा देण्याबाबत सुचित करावे अशी मागणी सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख यांनी शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
निव्वळ बिले काढण्या साठी दिखाऊपणे निकृष्ठ दर्जाच्या सुविधा दिल्या किंवा दिव्यांगासाठी कुठल्याही सुविधा दिल्या गेल्या नाही तर अशा शाळा वर्ग खोल्याच्या बांधकामाचे बिल वर्ग करू नये अशी अपेक्षाही शेख यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
संभाजी गुठे,नवनाथ औटी,मनोहर मराठे,खलील शेख,गणेश महाजन,सुनील वाळके,शिवाजी आहेर,बाबासाहेब गडाख,अनिल विघ्ने यांनीही दिव्यांग विद्यार्थ्यांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
0 टिप्पण्या