अहमदनगर : पावसाची अनियमितता आणि अनिश्चिततेमुळे अहमदनगर जिल्ह्याचा दक्षिण भागाचा पाण्यासाठी कायमच संघर्ष होत आहे.खडकाळ,डोंगराळ प्रदेश असल्याने येथे पावसाचे प्रमाणही अत्यल्प आहे.त्यामुळे या भागाला जलसमृद्ध करण्यासाठी भविष्यात मोठी लोकचळवळ उभी करावी लागणार असल्याचे मत नुकतेच प्रशासकीय सेवेतुन सेवानिवृत्त झालेले अहमदनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी व्यक्त केले.
अहमदनगर येथे मास्टर माइंड करिअर अकादमीमध्ये ‘जलसमृद्धी’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी हिंगणगावचे सरपंच आबासाहेब सोनवणे,खातगावचे सरपंच मिठू कुलट,भोरवाडीचे सरपंच भास्कर भोर यांच्यासह नगर,पारनेर आणि आष्टी तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्राततील कार्यकर्ते उपस्थित होते.माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली १९९९ मध्ये महाराष्ट्र जल व सिंचन आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारावर अहमदनगर दक्षिण भागातील दुष्काळी पट्ट्याला पाणीदार करण्याचा निर्धार भोर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.संगणक स्क्रीनवर प्रेझेंटेशन करून त्यांनी आयोगाने बनवलेले नकाशे, नगर जिल्ह्यासाठी केलेल्या शिफारशी, त्याकडे झालेले दुर्लक्ष याकडे लक्ष वेधले.
अहमदनगरवर अन्याय झाला : भोर
उंचवट्यावरील भाग,सर्वात कमी पर्जन्यमान आणि लहरी पाऊस आदी घटकांमुळे दक्षिण भाग विकासापासून आणि आर्थिक समृद्धीपासून वंचित राहिला.चितळे समितीच्या अहवालातून सर्वाधिक गरज अहमदनगरला असतानादेखील सिंचनाची अपेक्षित काम झालेली नाहीत.त्यास राजकीय इच्छाशक्तीबरोबरच जनसामान्यांची जोरदार मागणीचा अभाव जबाबदार असल्याचे भोर यांनी म्हटले आहे.चितळे समितीने केलेल्या शिफारशीबाबत जनभावना तयार झाल्यास अहमदनगर दक्षिण भाग पाणीदार होऊन समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘या’ उपाययोजना केल्यास दक्षिणेतील नद्या प्रवाही होतील -
• उजनी व जायकवाडी प्रकल्प यामधील बॅकवॉटर क्षेत्रात खाजगी उपसा केल्याने या दोन्हीही ठिकाणी कुकडी आणि मुळा लाभक्षेत्राचे पाणी वाचते. एकूण लाभक्षेत्रातील केवळ ६०-७० टक्के शेतकरी कालव्यातील पाणी घेतात. त्याठिकाणी ३०% पाणी वाचते.
• अतिपाणथळ ठिकाणी कालव्यामधील झिरपा कमी केल्यास पाण्याची बचत होईल.
• धरणातील अतिरिक्त पाणी जलसिंचीत क्षेत्रात सोडण्याऐवजी कोरडवाहू क्षेत्रासाठी देण्यात यावे.
• पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणे. शिफारशींनुसार काही प्रवाह वळविणे. पावसाळ्यात अतिरिक्त पाण्यावर वीजनिर्मिती करून त्याच विजेचा वापर करून उपसा करून कोरडवाहू भागातील नद्या आणि कालव्यात सोडणे.
कुकडी–सीना आणि पिंपळगाव जोगा–सीना जोड प्रकल्प ठरणार वरदान !
कुकडी कालव्यातून चोंडी येथे पाणी उपसा प्रकल्पाचे काम जवळपास मार्गी लागले आहे.पुढील टप्प्यात साखळाई आणि घोसपुरी योजनेला जोडण्याचे काम झाल्यास नगर,श्रीगोंदा आणि पारनेर तालुक्यातील गावांना मोठा लाभ होईल असा आशावाद भोर यांनी व्यक्त केला आहे.पिंपळगाव जोगा आणि कुकडी कालव्यातील पाण्याची उचल शहांजापूर (ता. पारनेर) येथे केल्यास तेथून हंगा,वालुम्बा व सीना नदी यामार्गे नगर व पारनेर तालुक्यातील गावे पाणीदार होतील अशी माहिती भोर यांनी दिली.पिंपळगाव जोगा धरणातून दशाबाई डोंगर पाणी उचलल्यास कान्हूर पठार,हंगा नदी आणि टाकळी ढोकेश्वर परिसरातील काही भाग सिंचनाखाली येऊ शकेल.मुळा बॅकवॉटरचा योग्य पद्धतीने उपसा आणि उचल केल्यास कोरठण,कर्जुले हर्या,गारखिंड,कासारे,भाळवणी,गोरेगाव आणि टाकळी ढोकेश्वरचा उर्वरित भाग ओलिताखाली येईल अशी अभ्यासपूर्ण माहिती भोर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.
दुरुस्ती आणि देखभाल खर्चही आवाक्यात...
ही योजना कार्यान्वित करताना वीज देयकाचा खर्च मोठा असणार आहे असे प्रथमदर्शनी भासते. मात्र त्यावरही कायमस्वरूपी उपाय करता येणे शक्य असल्याचे भोर म्हणाले.मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेच्या धर्तीवर माळरानावर सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारल्यास दुरूस्ती आणि देखभाल खर्चात मोठी कपात करता येणे शक्य आहे तसेच दुष्काळी भागात सिंचन व्यवस्था झाल्यास योजनेस विविध मार्गे आर्थिक उत्पन्नही मिळेल असेही ते म्हणाले.
0 टिप्पण्या