सहकार शिरोमणी - स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात (दादा)
प्रवरानदीच्या काठावर जोर्वे गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आपल्या जिद्दीने,कल्पकतेने व दुरदृष्टीने जनसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्यभर केलेले काम पुढील पिढीतील सामान्य कार्यकर्त्यांना दिशा देणारे आहे.खर्या अर्थाने लोकसेवेचा वारसा घेतलेल्या स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरातांचे (दादा ) यांचे जीवनकार्य हे समृध्द ठरले असुन ते राज्यातील 'सहकारातील शिरोमणी' राहिले आहेत.
शेतकरी कुटुंबातील जन्म,जोर्वे गावी प्राथमिक शिक्षण,पुढे बोर्डिग मध्ये शिक्षण घेत असतांना त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रभावीत होऊन विद्यार्थी दशेतच वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.१९४२ च्या आंदोलनातील ब्रिटीशांविरुध्दाच्या कारवायांमुळे त्यांना १५ महिने तुरुंगवास झाला.मात्र या काळात डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचा सहवास व त्यांच्या विचारांने प्रेरीत होऊन दादांनी १९४३मध्ये सुटका झाल्यावर महात्मा गांधींची ग्रामीण विकासाची संकल्पना घेवून आपले समाज विकासाचे कार्य सुरु केले.
गोरगरिब,शेतकरी यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शेतकर्यांना त्यांनी संघटीत केले.त्यांच्यासाठी विविध मोर्चे,आंदोलने केली.सोसायटीचे अध्यक्षपद ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्षपद हा त्यांचा सहकारातील प्रवास सर्वसामान्यांच्या उध्दाराचा राजमार्ग ठरला.त्याच काळात सरकारला सहकारात भाऊसाहेबांमुळे (दादा ) एक कायदाही पास करावा लागला.
स्वातंत्र्यानंतर शेतकर्यांसाठी त्यांनी सहकाराचा मार्ग निवडला.स्व.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील यांच्या विचारातून काम करतांना त्यांनी 'संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्या'ची मुहूर्त मेढ रोवली.दुष्काळी भागात व अत्यंत माळरानावर प्रतिकूल परिस्थितीत सुरु केलेला हा कारखाना सध्या सहकारी कारखानदारीसाठी दिपस्तंभ ठरला आहे.कमी पर्जन्यमान,सरकारी धोरणांचे अडथळे,आर्थिक अडचणी असताना देखील दादांच्या दुरदृष्टीतुन उभा राहिलेला हा कारखाना आर्थिक दृष्ट्या सक्षम ठरला आहे.८०० मे.टन ते ५५०० मेट्रीक टन क्षमता अशी दमदार वाटचाल करणार्या या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा विश्वास जपताना कायम उच्चांकी भाव दिला आहे.दादांची आर्थिक 'शिस्त,पारदर्शकता,काटकसर व आधुनिकता' ही चतु:सूत्री अनेकांना मार्गदर्शक ठरले आहे.त्यांच्या ग्रामीण विकासाच्या पायाभूत आराखड्याची अनेक वेळा शासनाने ही दखल घेवून अंमलबजावणी केली आहे.
कारखानदारी बरोबर शेतकर्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक उद्योग सुरु करतांना त्याकाळी सौर ऊर्जेबाबत दाखविलेली दुरदृष्टी किती व्यापक व काळाची गरज ओळखून होती हे आज लक्षात येते.आर्थिक फायदा असला तरी दारु उत्पादन करायचे नाही हा त्यांचा दुढ निश्चय खुप महत्वाचा ठरला.शेतकर्यांच्या कुटुंबाचे,समाजाचे स्वास्थ व आरोग्याचे भान जपणार्या या नेत्याची सामान्यबद्दलची आपुलकीची भावना यातुन समोर आली.प्रत्येक कुटुंबाचा काळजी वाटणारा नेता अशी ही भावना सर्वकालीन वंदनीय ठरते.ग्रामीण विकासासाठी 'सहकारातुन दुग्धक्रांती' घडविताना गावोगावी दुध सोसायट्यांची निर्मिती केली.शेतकर्यांना दुधाचा जोडधंदा निर्माण करुन अनेक कुटुंबामध्ये समृध्दी आणली.याच बरोबर 'सह्याद्री' , 'अमृतवाहिनी' या गुणवत्तेच्या शैक्षणिक संस्था उभ्या केल्या.आज अमृतवाहिनी शैक्षणिक संकुलात इंजिनिअरींग, तंत्रनिकेतन, एम.बी.ए, फार्मसी, मॉडेल स्कूल, आय.टी. आय, इंटरनॅशनल स्कूल अशा वेगवेगळ्या महाविद्यालयातुन सुमारे दहा हजार विद्यार्थी उच्च तंत्रशिक्षण घेत आहे.या संस्थेतील हजारो युवक देश-विदेशात उच्च पदावर काम करत आहेत.गावोगावी रस्ते,शाळा,बंधार्यांचे जाळे असे अनेकानेक विकासाचे कामे केली आहे.
डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचे परिवारिक व गुरु-शिष्याचे स्नेह जपत दादांनी समाजाच्या विकासाचा, सामाजिक समतेचा, आर्थिक विकासाचा व पुरोगामी विचारांचा वारसा जपला.यामध्ये डॉ.अण्णासाहेब शिंदे,अॅड.रावसाहेब शिंदे यांचे वैचारिक मार्गदर्शन मिळाले.
हाच समृध्द वारसा राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,आमदार डॉ.सुधीर तांबे हे जोमाने पुढे नेत आहेत.
१९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली.त्यावेळी भाऊसाहेबांनी आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही व काँग्रेस विचारांशी प्रामाणिक राहिले.
उत्तर नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी 'निळवंडे धरण' करणे हे त्यांचे स्वप्न होते.यासाठी त्यांनी अविरतपणे पाठपुरावा केला.ना.थोरात यांनी १९९९ मध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या दिवसापासून या कामाला गती दिली.आज हे धरण पुर्ण झाले असून ना. थोरातांनी कालव्यांचे मोठ-मोठे बोगदे पूर्ण करुन उर्वरीत कालव्यांची कामेही जलद गतीने सुरु केले आहेत.
१९८४मध्ये अमृतवाहिनी कॉलेजमध्ये झालेल्या त्यांच्या ६१ व्या कार्यक्रमाला स्व.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील हे दिग्गज नेते उपस्थित होते.आयुष्यभर समाज घडविण्याचे काम त्यांनी केले.
अखंडपणे जिल्हा बँक,राज्य बँक,सहकाराचे नेतृत्व करतांना दादांच्या स्वच्छ नेतृत्वावर कधीही डाग लागला नाही.त्यांच्या संपूर्ण जीवनकार्यातील विविध टप्प्यांवर सामाजिक,शेती,पर्यावरण,शिक्षण,ग्रामीण विकास अशा क्षेत्रात अलौकिक भरीव कामगिरी केली.अशा पुरुषांचा विचार हा जीवनाला ऊर्जा देवून जातो.वयाच्या ८४ व्या वर्षी पर्यावरण रक्षणासाठी हाती घेतलेले 'दंडकारण्य अभियान' ही चळवळ महाराष्ट्राला दिशा देणारी ठरली.या अभियानांतर्गत मागील १६ वर्षात सुमारे ३० कोटी बियांचे रोपण व २९ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले.या अभियानाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर 'युनो'ने घेतली.याचे अनुकरण करत राज्य सरकारने एक कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला.आयुष्यभर समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटणार्या या 'सहकारातील संता'स १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम..!
संपादन : प्रा.रामेश्वर तांबे पाटील,
अध्यक्ष- आ.डॉ. सुधीरजी तांबे प्रतिष्ठान,अहमदनगर.
मो.७५८८५४३३५५
1 टिप्पण्या
Khup chan
उत्तर द्याहटवा