Ad Code

जिल्हा प्रशासनाकडील सैनिकांच्या प्रलंबित कामांचा जलदगतीने निपटारा होण्याच्या उद्देशाने सैनिकांसाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन राबविणार 'अमृत जवान सन्मान अभियान' (amrut javan sanman abhiyan)

अहमदनगर  :  जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक,शहीद सैनिकांचे कुटूंब व कार्यरत सैनिक यांचे विविध विभागातील शासकीय कामे जलदरित्या व प्राधान्याने निपटारा करण्यासाठी येत्या ७ फेब्रुवारी पासुन 'अमृत जवान अभियान' राबविण्यात येणार आहे. २३ एप्रिल २०२२ पर्यंत ७५ दिवसाच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे.लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी 'अमृत जवान सन्मान दिन' आयोजित केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निःस्वार्थीपणे देशाची सेवा केली आहे व करत आहेत.त्यांची सेवा व समर्पण विचारात घेता त्यांचे मनोबल उंचावणे व उचित सन्मान करण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतुन हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

अहमदनगर जिल्हयात १५ हजारांपेक्षा जास्त माजी सैनिक असुन माजी सैनिकांच्या विधवांची संख्या जवळपास तीन हजार तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबांची संख्या ५० इतकी आहे.माजी सैनिकांवर अंदाजे पन्नास हजार कुटुंबीय अवलंबून आहेत.तसेच मूळ वास्तव्य या जिल्हयातील असलेले आणि सद्यस्थितीत भारतीय सेनेत जसे भुदल,नौदल व हवाई दलामध्ये कार्यरत असलेले आणि इतर निमलष्करी दलांमध्ये कार्यरत असलेल्या सैनिकांची संख्या देखील मोठी आहे.

सीमेवर तैनात असल्याने व स्व-ग्रामपासून दूर असल्याने सैनिकांची प्रशासनात अनेक कामे पाठपुरावा अथवा वेळेअभावी प्रलंबित असतात.जिल्हा प्रशासनाच्या वतीने सैनिकांचा सन्मान करण्यासाठी 'अमृत जवान सन्मान अभियान २०२२' राबविण्यात येईल.प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी 'अमृत जवान सन्मान दिन' आयोजित करुन लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभाग प्रमुख सैनिक अर्जदारांचे उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेतला जाणार आहे.

या अभियानाची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती व उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.प्रत्येक शासकीय विभागाने तालुका व जिल्हास्तरावर हे अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी.या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी कक्ष या तत्वाप्रमाणे सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.या कक्षात दररोज दुपारी १२ ते ३ या वेळेत कार्यरत सैनिक,माजी सैनिक व त्यांचे निकटवर्तीय यांचे विविध विभागांकडील तक्रार अर्ज स्विकारण्यात यावेत.अर्जाचे विभागनिहाय वर्गीकरण करुन संबंधित विभागांकडे ते अर्ज त्याच दिवशी पाठवावेत.या माध्यमातुन शासनाच्या इतर सर्व विभागाकडे सैनिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा केला जाणार आहे.तालुकास्तरीय समितीची बैठक सात दिवसातून एकदा आयोजित केली जाईल.या अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे.अभियानात अहमदनगर जिल्ह्यातील महसुल,पोलीस,ग्रामविकास,कृषी,नगरविकास,परिवहन,सहकार आदी विभागासह सर्व शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदवावा.त्याच प्रमाणे जास्तीत जास्त सैनिकांनी आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu