Ad Code

भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई  :  ‘ऐ मेरे वतन के लोगो’तुन प्रत्येक भारतीयांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य देणारे सुर तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याऱ्या देशाची गानकोकिळा तथा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांची गेल्या २८ दिवसांपासुनची प्रकृतीची झुंज अपयशी ठरली असुन मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला असुन हळहळ व्यक्त होत आहे.

लतादिदींना मागील महिन्यांत ८ जानेवारीला कोरोनाच्या लागण झाल्याने ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.कोरोनानंतर न्युमोनियाची देखील त्यांना लागण झाली होती.उपचारानंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते.मात्र शनिवारी (ता.०५) दुपारी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
लता दिदींची तब्येत पुन्हा खालावल्याने समजताच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे,गायिका आशा भोसले,खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेत उपचाराची माहिती घेतली.काल देखील लतादिदींचे बंधु संगीतकार हृदयनाथ मंगेशकर,चित्रपट निर्माते,मधुर भांडारकर,केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनीही भेट देऊन प्रकृतीची विचारपुस केली.
लता दिदींच्या सुमधुर आवाजाने गेल्या आठ दशकाहुन अधिक काळ जगभरातील भावविश्व समृद्ध केले आहे.संबंध देशभराच्या आयुष्यात दिदींच्या आवाजाने एक आनंद निर्माण केला होता.दिदींच्या निधनाने सर्व संगीत विश्वावर एकच शोककळा पसरली आहे.शारीरिकदृष्ट्या लता दीदी जरी आपल्यातुन निघुन गेल्या असल्या तरी त्यांच्या स्मृती स्वरमयी रूपाने चिरंतन राहतील अशी भावना व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu