Ad Code

'उद्योग क्रांती' आयोजित व्यवसाय पहावा करून कार्यक्रमात लोहगांवकर यांनी दिला उद्योजकतेचा मंत्र

अहमदनगर : दर महिन्याला एक लाख ३८ हजार रुपये देणारी सुखवस्तु नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय,तोही डबे पोहोच करण्याचा ठरवल्यानंतर अनेकांनी वेड्यात काढले.पण नोकरीत भटकंती करताना आलेल्या स्वानुभवातून लोकांना चांगले,पौष्टिक आणि घरच्या चवीची ओढ असल्याने जाणवले होते.त्यामुळे आधी अभ्यास करत बारकावे समजुन घेतले आणि नोकरीचा राजीनामा देत या व्यवसायात उडी घेतली.२०१२ मध्ये फक्त १७ डब्यांपासून सुरु झालेला हा प्रवास आज दशकपुर्तीत बर्‍यापैकी स्थिरस्थावर झाला आहे.कोणत्याही व्यवसायात अडचणी असतातच.त्यावर मात करायची तर निरीक्षण शक्ती,जिद्द,चिकाटी ठेवली पाहिजे.आपले आवडते क्षेत्र व्यवसाय म्हणून निवडल्यास यशोमार्ग नक्कीच गवसतो असा उद्योग मंत्र 'माय टिफिन'चे संस्थापक हेमंत लोहगांवकर यांनी दिला.


दि व्यंकटेश ग्रुप व डिझाईन ऍडिक्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग क्रांती उपक्रमांतर्गत शिवजयंती दिनी व्यवसाय पहावा करून या विषयावरील संवाद कार्यक्रमात युवा वर्गाशी संवाद साधताना लोहगांवकर बोलत होते.यावेळी व्यंकटेश ग्रुपचे संस्थापक चेअरमन अभिनाथ शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णा मसुरे,संचालक अनिल गुंजाळ,डिझाईन ऍडिक्टचे आर्टिस्ट ज्ञानेश शिंदे,व्यंकटेश फाउंडेशनचे ज्ञानेश्वर झांबरे उपस्थित होते.
उपस्थित युवकांशी संवाद साधताना लोहगांवकर यांनी अतिशय अनौपचारिक गप्पांतुन 'माय टिफिन'चा प्रवास उलगडून सांगितला.ते म्हणाले की,कुकिंगची आवड असल्याने दहावीनंतर मला हॉटेल मॅनेजमेंट करायचे होते.पण त्याकाळी या क्षेत्राची एवढी वाढ झाली नव्हती.हॉटेल मॅनेजमेंट करायचे म्हणजे तुला वेटर व्हायचे का ? असा प्रश्न उपस्थित केला जायचा.त्यामुळे मी बी.कॉम. करतानाच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्युटमध्ये तांत्रिक शिक्षणाचा कोर्स गोल्ड मेडल मिळवून उत्तीर्ण झालो.तेव्हा कोहिनूरचे सर्वेसर्वा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मला त्याच इन्स्टिट्युटमध्ये नोकरी देऊ केली.जोशी सरांसोबत काम करताना मिळालेला अनुभव माय टिफिन करिता मोलाचा ठरला.  २०११ मध्ये कोहिनूरमधील चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याचे ठरवले.हे करताना विठ्ठल कामत यांच्यासारख्या दिग्गजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला.वयाच्या ४२ व्या वर्षी पत्नीच्या पाठिंब्याने बुर्‍हाणनगरला घरातुनच माय टिफिनची मुहूर्तमेढ रोवली.सुरुवातीपासुन वेळोवेळी चांगले बदल अंगिकारत गेलो.आपल्याला जे आवडते तेच ग्राहकांना द्यायचे हा दंडक कटाक्षाने पाळल्याने २०१४ साली आय.एस.ओ.मानांकनही मिळवले.ग्राहकांचा विश्वास संपादन करून व्यवसाय वृद्धी करणे शक्य झाले.

कोणताही व्यवसाय करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.अनंत अडचणींना सामोरे जावे लागते.पण त्यातुनच मार्ग दिसतो.प्रचंड कष्ट घेण्याची तयारी तर हवीच जोडीला आपले व्यवसायावर व कामावर नितांत प्रेमही हवे.कोविड काळात धाडस दाखवून हॉस्पिटलमधील रूग्ण,त्यांचे नातेवाईक यांना डबे पोहचविण्याचे काम केले.या काळात जवळचे नातेवाईकही रूग्णापासुन अंतर राखून होते.पण आमच्या टिमने त्यांना आपुलकीने डबे पोहोच केले.याच दरम्यान सामाजिक बांधिलकी ठेवून आधार आपुलकी हा उपक्रम सुरु करून समाजातील गरजु विशेषत: ज्येष्ठांना मोफत डबे दिले.

अभिनाथ शिंदे यांनी उद्योग क्रांती उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की,बुलंद भारताच्या निर्मितीसाठी उद्योग,व्यवसाय वृध्दी महत्त्वाची आहे.भारतात सर्वात जास्त रोजगार लघु व सुक्ष्म उद्योगातून निर्माण होतो.दुर्देवाने आपल्या शिक्षण पध्दतीत नोकरी करणारे तयार होतात परंतु उद्योजकतेला तितके प्रोत्साहन मिळत नाही.ही कमतरता लक्षात घेऊन व्यंकटेश ग्रुप जास्तीत जास्त उद्योजक,व्यावसायिक तयार व्हावेत यासाठी पाठबळ देण्याचा प्रयत्न करीत असुन यशस्वी उद्योजकांना युवा पिढीसमोर आणुन एक प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी अनिल गुंजाळ यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu