Ad Code

अंगणवाडी सेविका व आशा सेविकांबाबत महिला व बालकल्याण विकासमंत्री यशोमती ठाकुर यांची महत्वाची घोषणा

शिर्डी  :  अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांच्याकरिता पेन्शन व एलआयसी योजना सह पगार वाढ करण्याची बाब विचाराधीन असुन याबाबत येत्या काळात निश्चितच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिली.
वसंत लॉन्स येथे एकवीरा फाऊंडेशनच्या वतीने कोरोनाच्या महासंकटात सेवाभावी पणे काम केलेल्या आरोग्य,अंगणवाडी व आशा सेविका,बचत गट महिला,मदतनीस या सर्व महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा कौतुक सोहळा संपन्न झाला.यावेळी मंत्री ठाकूर दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते.व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे,कांचनताई थोरात,नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे,शरयू देशमुख,एकवीरा फाउंडेशनचे अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्री थोरात,जिल्हा परिषद सभापती मिरा शेटे,पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर,लता डांगे,उत्कर्षा  रूपवते,अर्चना बालोडे,प्रमिला अभंग,निर्मला गुंजाळ,इंद्रजीत थोरात आदी उपस्थित होते.यावेळी सर्व महिलांना सन्मानपत्र,जेवणाचे डबे,आरोग्य कार्ड,एकविराची आरोग्य पुस्तिका यांसह आरोग्य किट देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री ठाकूर म्हणाल्या की,राज्यात महाविकास आघाडी सरकारने स्त्री - पुरुष समानतेसाठी सर्वसमावेशक असे नवीन महिला धोरण राबविले आहे. आरक्षणामुळे महिलांना राजकीय व्यवस्थेत प्रतिनिधित्व मिळाले आहे हे आपण मान्य करतोच ;पण महिलांना आरक्षणाबरोबर आदर मिळाला पाहिजे,यासाठी लोकांमध्ये जागृकता आली पाहिजे. अंगणवाडी सेविका,आशा सेविका,मदतनीस यांनी कोरोना संकटांमध्ये केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे.राज्यभरातील या सर्व भगिनीसाठी आगामी काळात एलआयसी योजना,पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी धोरण ठरविण्यात येईल तसेच बाल संगोपनासाठी दिल्या जाणाऱ्या अडीच हजार रुपयांऐवजी पाच हजार रुपये देण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे.डीपीडीसी मधून महिला-बालकल्याण व आशा सेविकांच्या व्यवस्थेसाठी तीन टक्के निधी राखीव ठेवला जाणार आहे असेही त्यांनी सांगितले.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की,राजीव गांधी यांनी देशामध्ये सर्वप्रथम महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. राज्य पातळीवर हे आरक्षण ५० टक्के केले गेले आहे.कोरोना संकट काळामध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांनी अत्यंत मोलाचे काम केले असून गावातील प्रत्येक घरा-दारातील सुख दुःखात या महिला भगिनी सहभागी होत असतात.गावांचे आरोग्य जपणे यामध्ये या महिलांचे मोठे काम असून त्यांच्या पगारवाढीच्या मागणी बाबत आपण सकारात्मक असून सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार आहे.
एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या वतीने तालुक्यातील सर्व आशा,अंगणवाडी,आरोग्य सेविका व मदतनीस यांचेसह त्यांच्या घरातील एक व्यक्ती किंवा नातेवाईक महिलांच्या देखील आठ प्रकारच्या तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.

नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या की,कोरोना संकटात काम करणाऱ्या महिला भगिनींचा संगमनेरात होत असलेला कौतुकसोहळा हा देशातील एकमेव कौतुक सोहळा असावा.तळागाळात जाऊन काम करणाऱ्या महिलांना यांमुळे नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे,तहसीलदार अमोल निकम,गटविकास अधिकारी अनिल नागणे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप,एकविराच्या सदस्य डॉ.वृषाली साबळे,सुरभी मोरे,शिल्पा गुंजाळ,प्राजक्ता घुले,अहिल्या ओहोळ,ऐश्वर्या वाकचौरे,ज्योती थोरात,पूजा थोरात,मिताली भडांगे,आदिती झंवर,जानवी कळसकर,मयुरी थोरात,अर्चना नवले यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकविरा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्री थोरात यांनी केले. सुत्रसंचालन आदिती खोजे व वैष्णवी कापसे यांनी तर प्राजक्ता घुले यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu