अहमदनगर : कर्जत तालुक्यातील बारडगाव दगडी येथील शशिकांत टिकल्या चव्हाण हे पारधी समाजातील शेतकरी.गुन्हेगारीचा शिक्का पुसून ते अनेक वर्षापासून शेती कसत कष्टातून स्वतः खरेदी केलेल्या शेतात द्राक्षबाग फुलवली आहे.गुन्हेगारीतुन परिवर्तनची वाट चोखळणाऱ्या या शेतकऱ्यांची इतरांना प्रेरणा मिळत असल्याने कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शशिकांतसह त्यांच्या कुटुंबाचा थेट शेतात जाऊन गौरव केला.गुन्हेगारीच्या अंधाऱ्या दुनियेतुन प्रकाशाची स्वाभिमानी वाट निर्माण करणाऱ्या आदर्शवत शेतकरी कुटुंबाचा थेट बांधावर जाऊन पोलिसांकडुन गौरव केल्याची बहुधा पहिलीच घटना असावी.पोलीस निरीक्षक यादव यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातुन कौतुक होत आहे.
बारडगाव दगडी येथील शशिकांत टिकल्या चव्हाण हे पारधी समाजातील.गावातीलच भाऊसाहेब वाकळे यांच्याकडून त्यांनी पंचवीस वर्षापुर्वी एक एकर शेती केवळ पाच हजार तीनशे रुपयांना खरेदी केली.उपजिविकेसाठी एकरभर हक्काची जमीन झाली खरी मात्र ही शेती कसायला देखील जवळ पैसे नसल्याने त्यांना काही काळ शेती कसता आली नाही.काही दिवस थांबुन त्यांनी एकदा बाजारातुन छोटे बोकड विकत आणले.काही काळानंतर त्याच्या विक्रीतुन आलेले पैसे आणि वेळोवेळी जमेल तसे साचलेली रक्कम असे मिळुन ठरलेली जमिनीची एकूण रक्कम देखील देण्यास त्यांना तब्बल 12 वर्षे लागली.
नगर जिल्ह्यातील कर्जत,श्रीगोंदा तालुक्यात पारधी समाजाची संख्या लक्षणीय आहे. त्यात अनेकांकडे गुन्हेगार म्हणून पाहिले जाते.शशिंकात चव्हाण हे पारधी कुटुंबातील.मात्र गुन्हेगारीकडे वळण्याएवजी त्यांनी पंचवीस वर्षापुर्वी शेती कसण्याचा निर्धार केला.त्यासाठी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत स्वकष्टाने माळरानावरील शेती खरेदी केली आणि शेती कसु लागले.सध्या त्यांच्याकडे एक एकरावर द्राक्षबाग आहे.याच जमीनीच्या कष्टावर त्यांनी डी.एड , एम.ए , बी.एड. असे उच्च शिक्षण दिले आहे.
मुलभूत सुविधापासुन दुर असल्याने गुन्हेगारीकडे वळणाऱ्या पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी काम सुरु केले आहे.त्यांसाठी गुन्हेगारी सोडून चांगले काम करणाऱ्या पारधी समाजातील व्यक्तीचा शोध घेत अशा व्यक्तीची ‘यशोगाथा’ ते समाजासमोर आणतात.त्याची इतर गुन्हेगार असलेल्यांना प्रेरणा देऊन गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याच उपक्रमातुन बारडगाव दगडी येथील शशिकांत चव्हाण यांच्या शेतात कुठलीही पुर्वकल्पना न देता यादव हे थेट हातात फेटे अन श्रीफळ घेऊन पोहचले.पोलिसांना फेटे व श्रीफळसह पाहून चव्हाण कुटुंब गडबडून गेले.जमीन खरेदीसाठी मोठी सवलत देणाऱ्या वाकळे यांचा मोठा त्याग असल्याचे सांगत पोलिसांनी चव्हाणांसह त्यांचाही गौरव केला.पोलिसांच्या सन्मानाने चव्हाण परिवाराच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.थेट बांधावर जाऊन समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या कुटुंबाचा पोलिसांकडून गौरव होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी.यावेळी पोलिस हवालदार तुळशीदास सातपुते,मनोज लातुरकर,ग्रामीण विकास केंद्राचे संविधान प्रचारक तुकाराम पवार,भाऊसाहेब वाकळे,गणेश कदम आदी उपस्थित होते.
पारधी व इतर समाजातील गुन्हेगारांनी गुन्हे न करता सन्मानाने जगण्यासाठी शेती किंवा अन्य रोजगाराकडे वळावे यासाठी आमचा प्रयत्न आहे.बारडगाव दगडी येथील शशिकांत चव्हाण हे पारधी समाजातील शेतकरी अशांसाठी निश्चित आदर्श आहेत.
चंद्रशेखर यादव,पोलिस निरिक्षक,कर्जत,जि.अहमदनगर.
0 टिप्पण्या