Ad Code

'उच्चशिक्षित बेरोजगारांची वारी, बारामतीच्या दारी'

अहमदनगर  :  महाराष्ट्रातील अशासकीय अनुदानित महाविद्यालये आणि अकृषी विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांची ( ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक यांच्यासह ) १०० % भरती करणे आणि तासिका धोरण बंद करणारा ' माने समिती ' चा अहवाल  स्वीकारून तात्काळ लागू  व्हावे या करिता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना साकडे घालण्यासाठी पुण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या संचालक कार्यालयापासुन बारामतीच्या गोविंदबागेपर्यंत महाराष्ट्रातील नेट-सेट पीएच.डी. पदवी प्राप्त उच्चशिक्षित बेरोजगारांनी ' उच्चशिक्षीत बेरोजगारांची वारी बारामतीच्या दारी ' या सत्याग्रहाचे आयोजन येत्या १३ ते १५ एप्रिल दरम्यान केले आहे.याबाबतचे लेखी निवेदन नेट-सेट,पीएच.डी. धारक संघर्ष समितीने अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

राज्यात सहाय्यक प्राध्यापक संवर्गातील व अशासकीय अनुदानित महाविद्यालये व अकृषी विद्यापीठे यामधील सहायक प्राध्यापकांची पदे वित्तीय अडचणी,आरक्षणाचे प्रश्न व प्रशासकीय हलगर्जीपणा या कारणांमुळे गेली बारा वर्षांपासून भरली गेलेली नाहीत.राज्यात उच्च शिक्षितांमधील बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याने एक सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे. उच्च शिक्षणावरील शासनाकडून केल्या जाणाऱ्या खर्चाबाबत नुकतेच 'कॅग'ने देखील ताशेरे ओढले आहेत. विद्यार्थ्यांची विना प्राध्यापक ज्ञानदानात होत असलेली फसवणूक आणि उच्च शिक्षण व्यवस्थेचा वाजलेला बोजवारा अशा सर्व प्रश्नांवरती वित्त विभाग व उच्च तंत्र शिक्षण विभाग यांची एकत्रित बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करून मार्ग काढावा यासाठी 'उच्च शिक्षितांची वारी, बारामतीच्या दारी' या उपक्रमांतर्गत पात्रताधारक आपल्या सर्व पदव्या दि. १३ ते १५ एप्रिल २०२२ रोजी पुणे ते बारामती (गोविंदबाग येथे) पायी वारी करून अर्पण करणार आहेत अशी माहिती नेट-सेट पीएचडी धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ.बाळासाहेब पवार यांनी येथे दिली. यावेळी डॉ. प्रमोद तांबे ,प्रा. विपुल धनगर, प्रा. अजय बनसोडे ,प्रा.रुमाना शेख ,प्रा. जयश्री जायभाये,प्रा. हरिदास गावित,प्रा. नागनाथ शेळके,प्रा.मयुर रोहोकले उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu