Ad Code

संघर्षाचे व्यासपीठ : माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे

बोधेगाव (ता. शेवगाव) येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे सहकारी साखर कारखाना परिसरात सोमवारी (ता.३०) माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतुक  व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत 'केदारेश्वर'च्या'च्या नियोजित ३० केएलपीडी क्षमतेच्या डिस्टीलरी इथेनाॅल प्रकल्पाचे भुमीपूजन आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्यावर आधारित 'महाराष्ट्र विधान मंडळातील श्री.बबनराव ढाकणे' या संपादित ग्रंथाचे प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने बबनराव ढाकणे यांच्या कार्याचा पत्रकार प्रा.रामेश्वर तांबे यांनी घेतलेला आढावा.....


कर्तृत्व,वक्तृत्व व नेतृत्वाच्या शिखरावर पोहोचत ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय मंत्री तथा विस्थापितांना सुस्थापित करण्यात आयुष्य वेचलेल्या बबनरावजी ढाकणे(साहेब) यांनी आपल्या चौफेर कर्तृत्वातुन तालुक्याची ओळख संपूर्ण देशाला करुन दिली.'प्रेरणादायी व सर्वसामान्यांचे प्रामाणिक नेतृत्व' अशा शब्दात ज्येष्ठ गांधीवादी नेते स्व. बाळासाहेब भारदे यांनी केलेले साहेबांचे वर्णन तंतोतंत खरे ठरले आहे.वयाच्या १४ व्या वर्षी दिल्लीला जाऊन पंडीत नेहरुंची भेट घेत अन्याया विरुध्द दाद मागितलेल्या बबनरावांची ग्रामीण शहाणपणाचा बाज असलेली बुध्दीमत्ता आजच्या काळातील उच्च विद्याविभुषीत व्यक्तीला मागे टाकत सर्वांनाच थक्क करणारी ठरली.


चळवळ,संघर्ष,अन्याया विरुध्द पेटून उठणे,संघर्षासाठी लोकांना जागृत करणे,प्रश्नाचा अभ्यास,त्याची सोडवणूक कशी करावी याचा गृहपाठ करण्याची तयारी ठेवून विविध नामांकीत व्यक्तीमत्वे,नेते यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिरुभाऊ लिमये यांच्या नेतृत्वाखाली गोवा मुक्ती संग्रामात वयाच्या सतराव्या वर्षी सहभाग घेतला.


नगर जिल्हयाच्या राजकिय व सामाजिक चळवळीचा गेल्या सहा दशकांचा आढावा घेतल्यास प्रस्थापितांविरोधात ढाकणेंनी 'संघर्षाचे व्यासपीठ' उभारत उपेक्षित व असंघटीत वर्गाला संघटीत करून त्यांना बोलते केले.'मुठी आवळून जाब' विचारण्याचे धाडस निर्माण केले.त्यातुन प्रत्येक तालुक्यात दुस-या फळीतील कार्यकर्ते उभे राहिले.ढाकणेंच्या मुशीत तयार झालेले गावोगांवचे कार्यकर्ते आज वयोमानाने थकले असले तरी अशा निष्ठावान कार्यकर्त्यांनी गावोगावी पेरलेल्या संघर्षाचे बीजाचे आज मोठा वटवृक्ष झाला आहे.गोरगरीब,अंगावर पुरेसे कपडे नसलेल्या व हातातोंडाची लढाई लढणा-या माणसांकरीता ढाकणेंनी शिक्षण संस्था काढली.माजी आमदार स्व.माधवराव नि-हाळी यांच्या वैचारिक मुशीतून घडलेले व्यक्तीमत्व तालुक्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यास कारणीभूत ठरले.सत्तेवर असो किंवा नसो प्रशासनावर त्यांचा आजही मोठा दबदबा आहे.


किल्लारीच्या भुकंपानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी साहेब तेथे गेले. गावाबाहेर दोन किलोमीटर सर्व वाहने थांबवली जाऊन मंत्र्यांच्या पोलीस अथवा प्रशासनाच्या वाहनातून आत पाठवले जाई.दुपारच्या वेळी ढाकणे साहेबांची गाडी चेक पोस्टला पोहोचली.वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम मुख्य यंत्रणेबरोबर उपस्थित राहुन जिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी करीत होता.कोणत्याही पदावर नसतांना किल्लारीतील थेट बेस कॅम्प पर्यंत फक्त ढाकणे साहेबांची गाडी सोडण्यात आली.तत्पूर्वी फक्त ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची गाडी आत सोडण्यात आली होती. तोच सन्मान त्यावेळी पद्मसिंह पाटलांनी उस्मानाबादला देऊन ढाकणे साहेबांबरोबर सुमारे तासभर राजकीय चर्चा केली. अशी अनेक उदाहरणे आहेत. त्यांच्या चौफेर नेतृत्वाने तालुक्याचे विविध मुलभुत प्रश्न सुटले.तालुक्यातील विविध मोठे तलाव,वीज उपकेंद्र,एस.टी. डेपो,उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रस्ते,आरोग्य उपकेंद्र,वांबोरी चारीचा संघर्ष,डोंगरी भागातील गावांचा विकास,नवीन बसस्थानक या प्रश्नांच्या सोडवणुकीसह हिंद वस्तीगृह नवनिर्माण,एकलव्य शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक विकास साधला गेला.कर्तृत्ववान व आक्रमक नेता अशी राज्यात प्रतिमा होऊन काही काळ राज्याबाहेर 'ढाकणेंची पाथर्डी' अशी ओळख निर्माण झाली होती.


ओबीसींची खरी चळवळ बबनरावांनी १९८० च्या दशकात सुरु केली.त्याची चर्चा वाढू लागताच ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी बबनरावांमधील नेतृत्व व निष्ठा घेऊन तथाकथीत नेत्यांचा विरोध डावलून सत्ताकारणात संधी दिली.ओबीसींचा चेहरा म्हणुन ढाकणेंची प्रतिमा राज्यात पवार साहेबांनी पुढे आणून सर्वच छोटया समाजाला जवळ ठेवले.राज्यात 'सहकारी साखर कारखानदाराच्या वर्तुळात ऊस तोडणी कामगारांची चळवळ' बबनरावांनी सर्व प्रथम हाती घेतली.तोडणी कामगारांचा देशातील पहिला साखर कारखाना म्हणून केदारेश्वर कारखान्याकडे पाहिले जाते.या कारखान्याच्या पायाभरणीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. कारखान्याच्या अनंत अडचणी व आव्हानांना तोंड देत यशोशिखरावर पोहचलेल्या आजची प्रगतीमध्ये ढाकणे साहेबांबरोबरच कुटुंबियांचेही मोठे योगदान आहे.


सत्तेसाठी तत्वांशी व मुल्यांशी तडजोड न करण्याच्या स्वभावामुळे ढाकणे साहेब सत्तेच्या वर्तुळाबाहेर पडले.तरीही प्रश्नांचा अभ्यास,राज्यकर्त्यांना मार्गदर्शन,कार्यकत्यांशी संवाद याव्दारे त्यांनी समाजकार्य सुरुच ठेवले आहे.त्यांच्या वैचारिक मुशीतून तयार झालेले विविध कार्यकर्त आज केंद्र व राज्यात मंत्री,आमदार,खासदार आहेत.पुत्र अॅड. प्रतापरावांचा सत्तेतील प्रवास त्यांनी सहजपणे सुरु ठेवला असता पण 'मुलांना कर्तृत्व करु द्या,कष्ट व संघर्ष करु द्या' , असा विचार व्यक्त करत त्यांनी कुणाकडे इच्छा प्रदर्शित केली नाही.


राज्यात सध्या ओबोसीचे राजकीय व सामाजिक अस्तित्व या मुद्यावरून वातावरण पेटले आहे.सर्वत्र परिचित असलेले ढाकणे कुटुंब अशी चळवळ राज्यभर हाती घेऊ शकते यासाठी पवार साहेबांनी प्रतापरावांना संधी द्यावी अशी कार्यकत्यांची भावना सुध्दा ढाकणे साहेबांनी त्यांच्या पध्दतीने अजुनही नेत्यांपुढे मांडली नाही,यावरून त्यांच्या तत्वनिष्ठ स्वभावाची कल्पना यावी.राज्यभरात साधी राहणी,साधा आहार-विहार व स्पष्टवक्तेपणासाठी ते आजही ओळखले जातात. विधान मंडळात ढाकणे साहेब बोलायला उभे राहिले की ग्रामीण समस्यांचे चित्र सभागृहापुढे येई.आरोप-प्रत्यारोप,गोंधळ आजसारखा नसला तरी सभागृह स्वतःभोवती फिरत ठेवण्यात जे नेते चर्चेत राहिले त्यात बबनरावांचे नांव पुढे होते.वंजारी समाजाची राजकिय वर्तुळात सामाजिक ओळख ढाकणेंनी दिली.त्यानंतर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा सामाजिक व्यासपीठावर उदय झाला.गल्ली ते दिल्ली सत्ता भोगूनही अहंकार पासून दुर राहीलेला एक खरा माणुस म्हणुन बबनराव ढाकणे साहेबांचे व्यक्तिमत्त्व व कार्य तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu