Ad Code

शेतकऱ्यांना फायद्याच्या वेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचा आरोप

बोधेगाव  :  दुष्काळाने ब्राझीलमध्ये साखर उत्पन्न घटल्याने जास्तीच्या उत्पादन असल्याने मोठी संधी असताना सरकारने निर्यातबंदी आणल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला नाही.तशीच परिस्थिती गव्हाच्या बाबतीतही झाली.त्यांमुळे जेव्हा शेतकऱ्यांना फायदा होण्याची वेळ येते तेव्हा केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याची टिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरद पवार यांनी केली.
बोधेगाव (ता. शेवगाव) येथील संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात आज(सोमवार) माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते 'केदारेश्वर'च्या'च्या डिस्टीलरी इथेनाॅल प्रकल्पाचे भुमीपूजन आणि माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांच्या सामाजिक व राजकीय जीवनकार्यावर आधारित 'महाराष्ट्र विधान मंडळातील श्री.बबनराव ढाकणे' या संपादित ग्रंथाचे प्रकाशन झाले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ,'बुलढाणा अर्बन'चे राधेश्याम चांडक,आ.निलेश लंके,आ.संग्राम जगताप,माजी आमदार नरेंद्र घुले,चंद्रशेखर घुले,भानुदास मुरकुटे,पांडुरंग अभंग,दादाभाऊ कळमकर,जनार्धन तुपे,साहेबराव दरेकर,माजी मंत्री बदामराव पंडित,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे,प्रभावती ढाकणे उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की,देशात प्रवरेला पहिला सहकारी साखर कारखान्याची यशस्वी उभारणी झाल्यानंतर राज्यभर पाण्याच्या बाबतीत सुबत्ता असलेल्या पट्ट्यात सहकारी साखर कारखानदारी उदयास आली.मात्र बबनरावांनी पाणी नसलेल्या दुष्काळी भागात बोधेगावला सहकारी साखर कारखाना उभा करण्याचे धाडस केले.या कारखान्याची चर्चा व्हायची तेव्हा ढाकणे कारखान्याला ऊस कोठून आणणार.? पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या तालुक्यात काय करणार? असा प्रश्न आम्हांला तेव्हा पडायचा.मात्र जिद्दीने कारखाना उभा केल्याचे श्रेय ऊस उत्पादक शेतकरी व कामगार या दोघांना दिले पाहिजे गौरवोद्गार पवारांनी काढले.पूर्वीसारख्या नसलेल्या या उद्योगात पुरक उत्पन्नासाठी व त्यांतुन शेतकऱ्यानं जास्तीच्या दोन पैशांसाठी साखर कारखान्यांनी साखरेबरोबर इथेनॉल,वीज व अल्कोहोल सारखे पुरक उपक्रम उभारावेत असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाला येऊ शकले नाही.त्यांनी ऑनलाईन व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या. आज साखर धंद्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे ‌.आपली गरज २६० लाख टनाची आहे‌‌. उत्पादन ३६० लाख टन आहे. ४० हजार कोटींची साखर निर्यात करूनही साखर शिल्लक आहे.तेव्हा जास्तीचे साखर उत्पादन न घेता इथेनॉल निर्मिती कडे वळले पाहिजे.शुगर कॅन ज्युस पासून सायरस निर्माण केले पाहिजे.देशाची २ लाख कोटी रुपये एवढी इथेनॉल अर्थव्यवस्था आहे.देशात फ्लेक्स इंजिनवर चालणारी वाहने निर्मितीस सुरूवात झाली आहे.भविष्यात पेट्रोल ऐवजी १०० टक्के बायोइथेनॉल वापर होणार आहे.तेव्हा कारखान्यांच्या फायद्यासाठी इथेनॉल निर्मिती करण्याचे आवाहन गडकरींनी केले.
आजही साखरेला टनामागे ४०० रूपये तोटा सहन करावा लागतो.साखर कारखाना काढणं तोट्याचा व्यवसाय झाला आहे‌.कारखाना फायद्यात आणण्यासाठी इथेनॉल सारख्या पर्यायी इंधनाचे उत्पादन वाढवावे लागणार असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले.
उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कारखान्याचे सीईओ घोळवे यांना पवारांच्या हस्ते सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी कारखान्याचे विविध गावांचेपदाधिकारी,कारखान्याचे संचालक,कर्मचारी,ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश ढाकणे यांनी केले.आभार उपाध्यक्ष डॉ.प्रकाश घनवट यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu