शेवगाव : तालुक्यातील कृषी केंद्राद्वारे शेतकऱ्यांना रास्त भावात बियाणे व खते मिळावीत तसेच त्यांची अडवणुक होऊन बेभाव पद्धतीने त्याची विक्री होऊ नये म्हणून तहसीलदारांच्या आदेशानुसार नियुक्त भरारी पथकाने शहरातील सर्व कृषी केंद्रांना भेटी देऊन पाहणी करत सक्त सुचना जारी केल्या आहेत.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्टिंग ऑपरेशन करुन कपाशीच्या कबड्डी या ८१० रुपये किंमतीच्या वाणाची सुमारे १४०० ते २००० रुपयांपर्यत विक्री होत असल्याचा प्रकार उघड केला होता.त्याबाबतची माहिती संघटनेने कळविताच तहसीलदारांनी आज सकाळी कृषी अधिकारी व संघटनेच्या कार्यकर्त्याची दालनात तातडीची बैठक घेतली. यावेळी तालुका कृषी अधिकारी अंकुशराव टकले,शेवगाव मंडल कृषी अधिकारी कानिफ मरकड,पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम,शेवगाव पोलीस निरीक्षक विलास पुजारी,गुप्तवार्ता विभागाचे बप्पासाहेब धाकतोडे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे,जिल्हाउपाध्यक्ष दत्ता फुंदे,तालुकाध्यक्ष प्रशांत भराट,बाळासाहेब फटांगरे,नारायण पायघन,नाना कातकडे,अमोल देवढे,मच्छिंद्र आर्ले,अशोक भोसले उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना अधिकृत किंमतीत बियाणे व खते उपलब्ध व्हावीत,मागणी असलेल्या व कमतरता असलेल्या बियाणांच्या वाणांचा पुरवठा वाढवावा,खते व बी-बियाणे विक्री करणाऱ्या दुकानात कृषी सहायकांची नेमणूक करावी तसेच चढ्या भावाने विक्री करणाऱ्या अथवा खते व बियाणांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या दुकानदारांवर सक्त कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या.
0 टिप्पण्या