Ad Code

अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधांसाठी मिळणार अनुदान : इच्छुक शाळांनी ३१ ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

(संग्रहित छायाचित्र)
अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा) : अल्पसंख्यांक विभागांतर्गत असणाऱ्या शाळांमध्ये पायाभूत सुविधा व शिक्षकांचे मानधन देण्यासाठी २०२२-२०२३ या वर्षाकरीता अनुदान योजना राबविण्यात येत आहे.या योजनेकरीता इच्छुक शाळांनी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी कार्यालय,अहमदनगर येथे प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या योजनेत अल्पसंख्यांक शाळांच्या इमारतींचे नुतनीकरण व डागडुजी,संगणक कक्ष उभारणे वा अद्यावत करणे,शैक्षणिक कार्यासाठी आवश्यक फर्निचर,इन्व्हर्टरची सुविधा निर्माण करणे,अध्ययनाची साधने,अध्ययनासाठी लागणारे विविध सॉफ्टवेअर,इंग्रजी लँग्वेज लॅब,पिण्याच्या शुध्द पाण्याची व्यवस्था करणे,प्रयोगशाळा उभारणे वा अद्यावत करणे,प्रसाधनगृह किंवा स्वच्छतागृह उभारणे अथवा डागडुजी करणे,झेरॉक्स मशीन वा एल.सी.डी.प्रोजेक्टर,संगणक हार्डवेअर सॉफ्टवेअर,ग्रंथालय अद्यावत करणे या सुविधांसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय,औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग या शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहे.योजनेचा लाभ राज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या मदरसांना दिला जाईल.अल्पसंख्यांक समाजाचे (मुस्लीम,बौध्द,खिश्चन,जैन,शीख,पारशी व ज्यु) किमान ७०% विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.शासनमान्य अपंग शाळांमध्ये (मुस्लीम,बौध्द,ख्रिश्चन,जैन,शीख,पारशी व ज्यु किमान ५०% अल्पसंख्यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे.
ही अनुदान योजना ७ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार राबविण्यात येणार आहे. या योजनेचा शासननिर्णय व अर्जाचा नमूना https://mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत असून त्यानंतर कोणतही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी भदाणे यांनी स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu