Ad Code

देशसेवेत आयुष्य व्यतित केलेल्या माजी सैनिकाचा प्रश्न सोडवा अन्यथा 'जनशक्ती'मार्फत आंदोलन - जगन्नाथ गावडेंचा इशारा

शेवगाव  :  ज्यांनी देशाची सेवा करण्यात आपले आयुष्य खर्च केले,त्यांच्या कुटुंबावर उपोषण करण्याची वेळ येणं ही दुर्दैवी बाब आहे अशी खंत जनशक्ती विकास आघाडीचे महासचिव जगन्नाथ (दादा) गावडे यांनी शहरटाकळी येथे केले.
शहरटाकळी येथील ग्रामपंचायतीने गावातुन बाहेर पडणारे गटारीचे सांडपाणी गावालगतच्या खराडे वस्ती शेजारी आणून सोडल्याने या सांडपाण्याचा वस्तीवरील ग्रामस्थांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने येथील ग्रामस्थ कचरू खराडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर काल बुधवार(ता.०९) सकाळपासून उपोषणास सुरवात केली आहे.त्यांच्या या उपोषणाला जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने पाठींबा देण्यात आला.यावेळी गावडे बोलत होते.याप्रसंगी जनशक्तीचे पदाधिकारी आबासाहेब राऊत,भाऊसाहेब सातपुते,मनोज घोंगडे,भाऊसाहेब राजळे,भागचंद कुंडकर,सुर्यकांत गवळी,शिवनाथ बोरुडे,सुभाष बरबडे,बप्पासाहेब गाढे,मेजर बाळासाहेब खराडे,दिलीप खराडे,ओंकार काकडे,विलास खराडे,राजेंद्र चव्हाण,डॉ.अमोल गायकवाड,गोविंद कावळे उपस्थित होते.
पुढे बोलतांना गावडे म्हणाले की,देशाचे रक्षण करणारे जवान आपल्या प्राणांची पर्वा न करता आपल्या सर्वांचे रक्षण करतात.हेच जवान सेवानिवृत्त होऊन गावाकडे आल्यानंतर समाजाने त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.मात्र शहरटाकळी ग्रामपंचायतकडून माजी सैनिक बाळासाहेब खराडे व त्यांच्या कुटुंबियांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असुन ही दुर्दैवी बाब आहे.प्रशासनाने लवकरात लवकर त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष घालून त्यांचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा जनशक्ती लक्षवेधी आंदोलन करेल असा स्पष्ट इशारा त्यांनी यावेळी दिला.तसेच शेवगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना फोनद्वारे संपर्क करून येत्या १५ दिवसात वरील प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली.
यावेळी कचरू खराडे म्हणाले की,ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील सर्व सांडपाणी आमच्या घरासमोर आणून सोडले आहे.याच पाण्यात ड्रेनेजचे पाणी देखील सोडले जात असल्याने या सांडपाण्याची दुर्गंधी परिसरात पसरली असून त्यामुळे येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.हेच सांडपाणी लोकवस्तीपासून लांब अंतरावर सोडावे अशी लेखी पत्र देऊन केलेल्या विनंतीची अद्यापही दखल न घेतल्याने आमच्यावर उपोषण करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu