Ad Code

पिण्याच्या पाण्यासाठी चार वर्ष अनवाणी पायांनी चालणाऱ्या तरुणाची ग्रामपंचायतीकडुन वचनपुर्ती : रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पिंगेवाडीत नळ पुजन व कुमार मुंढेंचा गौरव

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडी गावात नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर करण्यासाठी गावातील एका ध्येयवेड्या तरुणाने गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची भटकंती दूर होईपर्यंत चप्पल न घालता अनवाणी पायाने चालण्याचा संकल्प करत पाणी प्रश्नांचे गांभीर्य समोर आणले. त्याची दखल घेत ग्रामपंचायतीने प्रशासकिय पातळीवर प्रयत्न करून वित्त आयोगातुन घरोघरी नळ योजना सुरू करून ग्रामस्थांची पाण्यासाठीची वणवण थांबविली.त्यांमुळे चार वर्षापूर्वी सोडलेल्या संकल्पाची पुर्तता झाल्याने त्या तरुणाचा मिरवणुकीने येळेश्वर संस्थांनचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कुमार मुंढे असे या ध्येयवेड्या तरुणाचे नाव आहे.
कुमार मुंढे या तरुणाने गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी गावातील घरोघरी नळ कनेक्शनच्या माध्यमातुन पाणी मिळेपर्यंत चप्पल वर्ज्य करण्याचा संकल्प केला.त्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याची विनंती केली.ग्रामपंचायत प्रशासनाने देखील विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याने सरपंच,उप सरपंच,सर्व सदस्यांसह शासन दरबारी प्रयत्न करून वित्त आयोगातुन हा प्रश्न सोडवत गावात घरोघरी नळ सुविधा निर्माण केली.गावासाठी चपलेचा त्याग करत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत मुंढेंची पिंगेवाडी फाट्यापासुन गावापर्यंत वचनपुर्ती मिरवणूक काढण्यात आली.महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते नळ पुजन व मुंढे यांच्या पायात चप्पल घालण्यात आली.
यावेळी रामगिरी महाराज,अनिल महाराज मुंढे,जेष्ट मार्गदर्शक बंडूभाऊ शेलार,ग्रा.पं सदस्या रंजना तानवडे,सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख,राजेंद्र तानवडे,महादेव मुंढे,कुमार मुंढे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.अजुनही गावांतर्गतच्या विविध वाड्या-वस्तीवर घरोघरी नळ योजना पोहचलेली नाही.त्यामुळे पाण्यापासुन वंचित असलेल्या या सर्व वस्त्यांना जलजीवन योजनेंतर्गत सुमारे दीड कोटी रुपये खर्चून येत्या काळात लवकरच स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे प्रशासनाच्या वतीने यावेळी जाहीर करण्यात आले.
माय-भगिनींना डोक्यावर लांबुन पाणी आणावे लागायचे.म्हणुन या विषयांचे गांभीर्य प्रशासनाला समजावे म्हणुन चार वर्षापुर्वी चप्पल सोडली.घरच्यांसह मित्र परिवाराच्या रोषाला यांमुळे सामोरे जावे लागले.प्रसंगी शेती करताना रात्री-अपरात्री  अनवाणी पायाने फिरत त्रास सहन केला.मात्र ग्रामस्थांसाठी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो.आज याची पुर्तता झाल्याने मनस्वी आनंदी असल्याचे उद्गार कुमार मुंढे यांनी काढले.
यावेळी सरपंच परवीन शेख,उपसरपंच संजय तानवडे,माजी सरपंच मंगल जाधव,माजी उपसरपंच संगिता जायभाये,ग्रामसेवक सुनील राठोड,सावली दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष चांद शेख,सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र जायभाये,अशोक तानवडे,नंदकुमार मुंढे,रंजना तानवडे,उज्ज्वला मुंढे,फरीदा शेख,अतिष अंगरख,शैलेश गर्कळ,सुनील घुले,किशोर अंगरख,संतोष अंगरख,शरद शेलार,अण्णासाहेब जाधव,सतीश मुंढे,रमेश तानवडे,विलास देशपांडे,गणेश जायभाये आदी ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.याप्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu