अहमदनगर : पत्रकारही समाजातीलच माणूस असतो व त्यालाही हृदय, मन व भावना असतात.पण समाजातील बर्या-वाईट घटनांचा सखोेल शोध घेऊन तो जेव्हा सत्य मांडतो,तेव्हा समाजाचा खर्या अर्थाने विकास होत असल्याचे प्रतिपादन नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी केले.विकसित समाजाच्या निर्मितीसाठी पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असते. पत्रकार हा समाजाला दिशा देण्याचे काम करतो.समाजाचे विविध आजार बरा करणारा डॉक्टरचीही भूमिका पार पाडतो,असेही शेखर यांनी आवर्जून सांगितले.
नगरमधील वरिष्ठ पत्रकार विजयसिंह होलम यांनी लिहिलेल्या बातम्यांच्या पलीकडील विश्व या पत्रकारितेतील अनुभवांवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (६ ऑगस्ट) सीएसआरडी महाविद्यालयाच्या सभागृहात शेखर यांच्या हस्ते झाले.पुण्याच्या चिनार पब्लिकेशन तर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.यावेळी आमदार संग्राम जगताप,महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया,सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे,सौ. विद्युल्लता शेखर पाटील,केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी अशोक ठोंबरे,होलम यांचे वडील मोहनराव होलम पाटील,ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.
पत्रकार हा विडंबनकार,समाजसुधारक,टीकाकार,व्यंगकार,अंधश्रद्धा निर्मूलन करणारा तसेच चांगली कामे करणारी व्यक्तिमत्वे उभी करणारा मूर्तीकारही असतो.अशा पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातून आलेल्या होलम यांनी बातम्यांच्या पलीकडील विश्व मांडताना,जे अनुभव कथन केले आहेत,ते पत्रकारितेतील नव्या पिढीला दिशादर्शक तर आहेच.पण पत्रकार म्हणून बातम्या शोधताना आलेले चांगले-वाईट अनुभव वाचकांनाही पत्रकारितेचे अंतरंग दाखवणारे आहे,असे सांगून शेखर पाटील यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पत्रकारिता व गुप्तहेर यांची माहिती दिली.
आमदार जगताप म्हणाले,कामाच्या माध्यमातून नव्हे,तर विचारांच्या माध्यमातून माणसाची खरी ओळख निर्माण होते.लेखक त्याचे विचार समाजा समोर मांडतो व हीच त्याची ओळख असते.पत्रकारिता क्षेत्र तणावपूर्ण असून,यामध्ये दहा वर्षात मोठा बदल झाला आहे.टाळेबंदीत डिजिटल मीडिया झपाट्याने पुढे आली.काही क्षणांमध्ये माहिती सर्वत्र पोहचू लागली आहे.पण वृत्तपत्राचे महत्त्व कमी झाले नसून,त्याचे वेगळेपण आजही टिकून आहे.होलम यांचे पुस्तक नवीन पत्रकारांना मार्गदर्शक ठरेल व लिखाणाचा वारसा भावी पिढीला उपयोगी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नरेंद्र फिरोदिया यांनी पत्रकारीता क्षेत्र धाडसी व निर्भीडपणाचे असून,होलम यांनी निर्भीडतेने पत्रकारिता केली.त्यांनी लिहिलेले पुस्तक हा एक पत्रकारांसाठी ठेवा झाला आहे.साहित्यिक सेवानिवृत्त होत नाही.आयुष्यभर त्याची पुंजी व कार्य सुरू असते.कोरोना काळात वृत्तपत्रे घरोघरी येत नव्हती,त्यावेळी डिजिटल माध्यम,इलेक्ट्रॉनिक मिडीयात ब्रेकिंग न्यूज सुरु होत्या.मात्र,बातमी मागील बातमी मिळवण्यासाठी व वंचितांना न्याय देण्यासाठी हाडाचा पत्रकार व वृत्तपत्र न्याय देऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक ठोंबरे म्हणाले की,आपल्या मातीशी नाळ जोडलेल्या पत्रकाराने आपल्याच मातीतल्या विविध घटना पुस्तकात शब्दबद्ध केल्या आहेत.पुस्तकातील सर्व पात्र सत्यतेवर आधारित असून,त्या पात्रातील सर्व व्यक्ती पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित असल्याचा आगळावेगळा अनुभव आला.सुपरफास्ट युगात पत्रकार टीआरपीच्या पाठीमागे धावत आहे.मात्र,काही होलम यांच्यासारखे पत्रकार माणसातील माणूसपण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे.असे प्रतिभावंत पत्रकार समाजाला लाभल्यास खरी पत्रकारीता जिवंत राहू शकेल व समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्युल्लता शेखर पाटील म्हणाल्या की,लोकशाहीतील चौथा स्तंभ असलेला पत्रकार तिन्ही स्तंभांवर निरीक्षणाचे कार्य करीत असतो.नकारात्मक गोष्टींवर अंकुश लावण्याचे कार्य ते करीत असतात.पत्रकारामध्ये समाज परिवर्तनाची शक्ती आहे. पत्रकार व पोलिस यांचे कार्य जवळपास सारखे असून, २४ तास त्यांना सतर्क राहावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात डॉ.सुरेश पठारे यांनी सीएसआरडीचे माजी विद्यार्थी असलेले होलम यांच्या पुस्तकाचे प्रकाशन महाविद्यालयातच होत असल्याचा आनंद आहे.त्यांची पत्रकारितेतील लेखणी आगळीवेगळी व सर्वसमावेशक आहे. सामाजिक प्रश्नांची धार त्यांच्या लेखणीला असून,महाविद्यालयाच्या शैक्षणिक संस्काराची जोपासना त्यांनी आपल्या कामातून केल्याचे आवर्जून सांगितले.
लेखक विजयसिंह होलम यांनी पुण्याला बदली झाली.पण तेथे मन रमले नसल्याने पुण्यातून परत नगरला आलो.मातीतल्या लोकांसाठी काम करायचे या भावनेने काम केले.ज्या शहराने मोठे केले,त्या शहरात २२ वर्षे पत्रकारिता करताना विविध घटनेतील अनुभव पुस्तकात मांडले.आपले शहर आपली माणसे यांच्या प्रेरणेतून या पुस्तकाची निर्मिती झाली,असे त्यांनी सांगितले.
पाहुण्यांचे स्वागत मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख,'घर घर लंगर सेवे'चे हरजितसिंह वधवा,महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर यांनी केले.
यावेळी होलम यांच्या पुस्तकातील एका लेखाचे कथानायक असलेले व चुकून पाकिस्तानात जाऊन सुखरुप परत आलेले नगर तालुक्यातील वडगाव गुप्ताचे भानुदास कराळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.होलम यांच्या पुस्तकातील अन्य ३१ कथानायकांचाही यावेळी सन्मान केला गेला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी,महापालिकेच्या माजी प्रसिध्दी अधिकारी निलिमा बंडेलू व ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार राजू शेख यांनी पत्रकारितेशी संबंधित जुन्या आठवणींना उजाळा दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अमोल बागुल यांनी केले.आभार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी संदीप कुलकर्णी,अशोक परुडे,श्रीकांत वंगारी,अनिरुद्ध तिडके,सुजयसिंह होलम,अफताब शेख,नवेद शेख आदींनी परिश्रम घेतले.यावेळी नगरच्या पत्रकारिता व साहित्य विश्वासह शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या