Ad Code

जिल्‍हा दुष्‍काळमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्‍न करणार - महसुलमंत्री विखे पाटील

अहमदनगर (जिमाका वृत्तसेवा) : जिल्‍ह्यात पाण्‍याचा प्रश्‍न महत्‍वाचा असून आगामी काळात जिल्‍हा दुष्‍काळमुक्‍त करण्‍याचे आपले एकच ध्‍येय असून दुष्‍काळी भागातील लोकांना पाणी उपलब्‍ध करून देण्‍यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूल,पशुसंवर्धन व दुग्‍धविकासमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज दिली.
राष्‍ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांना साहित्‍य वाटप कार्यक्रम व जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बु-हाणनगर येथे १९५ कोटी रुपयांच्‍या प्रादेशिक नळपाणी पुरवठ्याचा योजनेच्‍या भुमीपुजन समारंभाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार प्रा. राम शिंदे,माजी मंत्री शिवाजी कर्डिले,खासदार सुजय विखे पाटील,भाजपचे जिल्‍हाध्यक्ष अरुण मुंढे,प्रतिभाताई बबनराव पाचपुते,अक्षय कर्डिले आदी उपस्थित होते.
महसुल मंत्री विखे पाटील म्‍हणाले,नगर जिल्‍ह्यात दुष्‍काळग्रस्‍त भागात साकळी पाणीपुरवठा योजनेच्‍या माध्‍यमातुन पाणी उपलब्‍ध करून दिले जाईल.बु-हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस या शासनाने मंजुरी दिली असून या योजनेच्‍या माध्‍यमातुन या भागातील नागरिकांचा पाणी प्रश्‍न सुटण्‍यास मदत होईल.येत्‍या काळात जिल्‍ह्याचा विकास आराखडा तयार करण्‍यात येणार असून यामध्‍ये बंद पडलेले उद्योग सुरू करणेबाबत तसेच तरुणांना रोजगार उपलब्‍ध करून देणेबाबत प्रयत्‍न करणार असल्‍याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या प्रयत्‍नातुन राष्‍ट्रीय वयोश्री योजनेच्‍या माध्‍यमातुन जिल्‍ह्यातील गरीब गरजु लोकांना व्‍हील चेअर,कानाचे मशिन,चष्‍मा,काठी आदी साहित्‍यांचे वाटप करण्‍यात येत आहे.या साहित्याच्या वाटपात देशात अहमदनगर जिल्‍हा पहिल्‍या क्रमांकावर आहे.सध्‍याचे राज्‍य सरकार हे जनतेच्‍या मनातील सरकार असून पुढील अडीच वर्षात जनतेच्‍या विविध अडचणी सोडविणार असल्याचे आश्वासन त्‍यांनी दिले.
या कार्यक्रमप्रसंगी आमदार प्रा.शिंदे,माजी मंत्री कर्डिले, खासदार डॉ.सुजय विखे पाटील,प्रतिभाताई पाचपुते,अक्षय कर्डिले यांचेही मनोगते झाले.कार्यक्रमाच्‍या सुरवातीला मान्‍यवरांच्‍या हस्‍ते नळ पाणी पुरवठा योजनेचे भुमीपुजन व कोनशिला अनावरण झाले.कार्यक्रमात प्रातिनिधीक स्‍वरूपात महसुलमंत्री व इतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते केंद्र शासनाच्‍या राष्‍ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थ्‍यांना विविध साहित्‍याचे वाटप करण्‍यात आले.या कार्यक्रमाला तालुक्‍यातील विविध संस्‍थांचे पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्‍थ मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu