Ad Code

ब्लॉगच्या माध्यमातुन सर्वसामान्यांना 'महसुली ज्ञान' खुले : राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन शेख यांची विशेष कामगिरी


शिर्डी (उमाका वृत्तसेवा) : निव्वळ कार्यालयीन कामकाज न करता आपल्या ज्ञानाचा,आपल्याकडील माहितीचा समाजाला उपयोग झाला पाहिजे यासाठी अविश्रांत मेहनत घेऊन राहाता मंडळ अधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी ‘महसूल मित्र’ नावाचा ब्लॉग तयार केला.या ब्लॉगवरील महसूली नियम,कायदे,प्रशासन,निवडणूक,शासकीय परिपत्रके या विषयींचे लेख व पुस्तकांच्या माध्यमातून माहितीचा खजिनाच सर्वसामान्य लोकांसाठी मोफत खुला झाला आहे.१ जुलै २०१५ रोजी सुरू केलेल्या या ब्लॉगवर आजअखेर १२ लाख ८१ हजार वाचकांनी भेटी दिल्या आहेत.भारतीय प्रशासकीय सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ब्लॉगवरील माहितीचे कौतुक केले आहे.


साखर आयुक्त डॉ.शेखर गायकवाड यांनी सुरू केलेल्या ब्लॉगची प्रेरणा घेऊन डॉ.शेख यांनी स्वत:चा ‘महसुल मित्र मोहसिन शेख’  नावाचा mohsin7-12.blogspot.com हा ब्लॉग सुरू केला. मागील सात वर्षात या ब्लॉगने उत्तुंग भरारी घेतली असुन साडे बारा लाख प्रेक्षक संख्येचा टप्पा ओलांडला आहे.महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे चारही खंड या ब्लॉगवर उपलब्ध आहेत.‘महसूल वाचनालय’ या विभागात डॉ.मोहसिन यांनी स्वत: संकलित व संपादित केलेल्या विविध विषयांची ५० पुस्तके उपलब्ध आहेत.आस्थापना विषयक विविध नियम व तसेच अर्जांचे नमुने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.गौणखनिज,पुरवठा व निवडणुक विभागातील महत्त्वपूर्ण माहिती,परिपत्रके यांच्या नोंदी ब्लॉगवर उपलब्ध आहेत.

शासकीय प्रकाशन-पुस्तके या विभागात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६८ पासून ते भारतीय वारसा अधिनियम १९९५ पर्यंतच्या महत्त्वपूर्ण २४ कायदे/नियम अपलोड करण्यात आले आहेत.वाचकाला कंटाळा येऊ नये यासाठी ब्लॉगवर विविध प्रसिध्द ब्लॉग,वृत्तपत्रे,चालू घडामोडी व शासकीय संकेतस्थळांच्या लिंक देण्यात येऊन माहितीत रंजकता आणण्यात आली आहे.
ब्लॉगवर महसूल प्रश्नोत्तरे,जाणून घ्या महसुल संलग्न कायदे,महसूल न्यायालय,जनमाहिती अधिकारी,चला गोष्टीतून फेरफार शिकुया,तलाठी कामकाज मार्गदर्शिका,महसुल तालुकास्तरीय समित्या रचना व कार्य,१०१ महसुली लेख व ऑनलाईन ७/१२,ही पुस्तके साध्या व सोप्या भाषेत असल्यामुळे जास्त लोकांनी डाऊनलोड केली आहेत. ब्लॉगवर उपलब्ध असलेल्या ई-पुस्तकांची छपाई करून नागरिकांना मोफत वितरण करण्याचे उपक्रम अनेक सेवाभावी संस्थामार्फत राबविण्यात आला आहे.
भारताबरोबरच अमेरिका,रशिया,तुर्केमेनिस्तान,नेदरलँड,इंडिनोशिया,संयुक्त अरब आमिराती व जर्मनी आदि देश-विदेशातील वाचकांनी ब्लॉगला भेटी दिल्या आहेत.ब्लॉगसोबत डॉ.शेख यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातुन आजपर्यंत तीन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले आहे.राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या लोकप्रिय ब्लॉग https://maharashtracivilservice.org  वर सुध्दा ‘महसुलमित्र’ ब्लॉगची लिंक देण्यात आली आहे.ब्लॉग पूर्णपणे मराठीत तयार केल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्गापर्यंत सहजच पोहचला आहे.ब्लॉगवरील माहिती उत्कृष्ट व संग्राह्य आहे अशी  प्रतिक्रिया वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांतुन उमटत आहे.


महसुल मित्राच्या उपक्रमाबाबत डॉ.मोहसिन शेख म्हणाले,'सर्वसामान्य लोकांना महसूलविषयक नियम व कायद्यांची माहिती साध्या व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लॉग सुरू केला.कार्यालयीन कामातुन वेळ काढून माहिती संकलित करण्याचे काम केले.यासाठी महसुल विभागातील उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांचा सिंहाचा वाटा असुन त्यांनी जवळपास २५० लेख लिहिले आहेत तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळालं म्हणुन ही माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहचवू शकलो.महसुल वाचनालय मध्ये सध्या ७० पुस्तके व लेख उपलब्ध असून येत्या १५ दिवसात ही संख्या ३०० पेक्षा जास्त केली जाईल तसेच पुढील काळात यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातुन महसूल विषयक माहिती साध्या व सोप्या भाषेत लोकांपर्यत पोहचविण्याचा मनोदय आहे.'
राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे म्हणाले,महसुलमित्र ब्लॉगच्या माध्यमातुन लोकांना समजण्यास अवघड असलेले कायदे व नियम सहज भाषेतुन मांडण्याचे काम डॉ.मोहसिन शेख यांनी केले आहे.पारंपरिक माहितीत नाविन्यता आणल्यामुळे ब्लॉग वाचनीय झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu