Ad Code

अतिवृष्टीच्या तडाख्याने बोधेगाव परिसरातील शेती संकटात : खरीप पिकांना जबर तडाखा ; अतिपाण्याने कपाशी वाया , बांध फुटले,घरांची मोठ्या प्रमाणात पडझड , प्रशासनाने फिरवली पाठ

शेवगाव : सोमवारी (ता.१७) रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीने शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसराला जबर तडाखा बसला.ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने बोधेगाव परिसरातील शेत-शिवारात पाणीच पाणी झाले असुन हाताशी आलेले खरीप पिके पुर्णतः हातातुन निसटली आहेत.नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कपाशीची पक्व झालेली बोंडे काळी पडली असुन फुटलेल्या कापुस वाहून गेल्याचे चित्र आहे.पर्यायाने उधार उसनवारी वा हात उसने आणि कर्ज काढून मोठ्या हिंमतीने फुलवलेल्या शेतीतील पिकांचे मातेरं झाल्यानं शेतकरी हताश झाल्याचे चित्र दिसत आहे.विशेष म्हणजे या पावसाने शेता शेतातील बांध फुटले असुन शेतरस्तेही खचले आहेत तसेच नदी नालेही तुडुंब भरून वाहत आहेत.बोधेगावमधील कित्येक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने गृहपयोगी वस्तु,शेतमाल,धन-धान्य पावसाच्या पाण्याने वाया गेले आहेत.दरम्यान,बोधेगाव परिसराला पावसाने जबर तडाखा दिलेला असताना देखील प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसुन आले.डोळ्यांदेखत शेतमालाची नासाडी होत असताना आणि घरांची पडझड झालेली असताना किमान आपत्तीग्रस्तांना भेटून दिलासा देण्याचे औदार्य प्रशासनाने दाखवले नसल्याने नागरिकांतुन संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी (ता.१७) मध्यरात्री बाराच्या सुमारास सुरू झालेल्या विजेच्या गडगडाटासह ढग फुटी सदृश मुसळधार पावसाने बोधेगाव परिसराला झोडपले.शुक्रवार(ता.१४) रोजी दुपारी मुसळधार पाऊस झाला होता.त्यानंतर रविवारी देखील पावसाने झोडपले होते.त्यांमुळे चार दिवसांपासुन दोनदा अतिवृष्टी झाल्याने परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले.शेत शिवारात पाणीच पाणी वाहून बांध-बंदिस्ती फुटल्याने अद्यापही शेता-शेतातुन पाणी वाहताना दिसत आहे.
परिणामी शेताच्या बांधाला मोठ-मोठे घळ पडून शेतातील पिकासोबत सुपीक मातीही वाहून गेल्याचे पाहाव्यास मिळत आहे.परिसरात प्रमुख नगदी पीक असलेल्या कपाशीची वेचणीला आलेली बोंडे गळून पडली तर कच्च्या पक्व झालेल्या कपाशीच्या दोड्या काळ्या पडल्या आहेत.शेतात साचलेल्या तसेच पावसाच्या संततधारीने खरीपातील पीके पिवळी पडू लागली आहेत.तुरीवर बुरशीजन्य रोगराईचे आक्रमण होण्याची शक्यता बोलली जाते आहे.काही ठिकाणी शेतात मोठ्या डौलात उभा असलेल्या ऊसाने धरतीशी लोटांगण घातल्याने ऊसाला उंदीर,घुशी आणि रानडुक्करासारख्या वन्य प्राण्यांचा धोका अधिक तीव्र झाला आहे.अशा पडलेल्या ऊसामध्ये वीस ते तीस टक्क्यापर्यंत घट येण्याची भीती जाणकारातुन व्यक्त होत आहे.दरम्यान, या पावसामुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर काहींच्या घरांच्या भिंती कोसळल्या.
राम घोरतळे यांच्या घरांचे पत्रे रात्री अडीच वाजेच्या सुमारास उडाल्याने पुर्ण संसारोपयोगी साहित्य पावसाने भिजले.
महादेव दिवटे यांच्या घरात पाणी शिरल्याने शेतमाल,संसारोपयोगी साहित्यांचा सत्यानाश झाला.
सुभाष दिवटे यांच्याही घरात शिरलेल्या पाण्याने शेतीतुन वेचुन आणलेला कापुस पाण्यांवर तरंगत होता तर पिकांसाठी आदल्या दिवशी आणलेल्या रासायनिक खतांच्या २५ बॅगाचे पाणी झाले.मात्र जीवितहानी कुठेही झाली नाही.
दरम्यान,तालुक्यात अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बोधेगाव परिसराला बसला आहे.त्यांमुळे शेती संकटात असताना आणि सामान्य नागरिक,शेतकरी यांचे मोठे नुकसान झालेले असताना देखील तालुका प्रशासन बोधेगावकडे फिरकले नसल्याचे वास्तव आहे.प्रशासनाच्या या भुमिकेवर नागरिकांतुन नाराजी व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu